Coronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चा धोका वाढला ! दिवसभरात 2188 नवीन रुग्ण, 34 जणांचा मृत्यू

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक पहायला मिळत आहे. दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित आढळून येत आहेत. शिवाय, रुग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठी वाढ होत आहे. राज्यात कोरोना संसर्ग वेगाने पसरत असल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण पडत आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असताना राज्यातील प्रमुख शहरांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये वेगाने वाढ होत आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना मृतांची संख्या वाढत आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये गेल्या 24 तासात तब्बल 2188 नवीन रुग्णांची भर पडली आहे. तर 34 जणांचा मृत्यू झाला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात शहरात 2188 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 लाख 69 हजार 964 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 2439 रुग्णांची कोरोनाची दुसरी टेस्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्य़ंत 1 लाख 42 हजार 464 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरामध्ये सध्या 25303 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

शहरामध्ये रुग्णसंख्या वाढत असताना मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. आज दिवसभरात 34 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामध्ये 21 रुग्ण शहरातील आहेत. तर 13 रुग्ण हद्दीबाहेरील आहेत. आजपर्यंत शहरामध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 3096 इतकी झाली आहे. यामध्ये शहरातील 2198 तर हद्दीबाहेरील 898 रुग्णांचा समावेश आहे. आज मृत्यू झालेले पिंपळे गुरव, रुपीनगर, चिखली, पिंपरी, कुंदननगर, चऱ्होली, चिंचवड, थेरगाव, दिघी, निगडी, रहाटणी, किवळे, काळेवाडी, आकुर्डी, बिबवेवाडी, मुळशी, धानोरी, खेड, औंध, बावधन, येरवडा, कोथरुड, कात्रज, कोंडवा येथील रहिवाशी आहेत.