Coronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या रुग्णसंख्येत घट, मृतांची संख्या वाढली, दिवसभरात 1838 नवीन रुग्ण, 41 जणांचा मृत्यू

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात कोरोनाचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण येत आहे. प्रशासनाकडून कोरोनाची साखळी तोडण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, कोरोनाचे संक्रमण वाढ असल्याने शासन कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. राज्यात पुणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसून येत आहे. पिंपरी चिंचवड या औद्योगीक शहरामध्ये देखील मागील काही दिवसांपासून रुग्ण वाढत आहे. कालच्या तुलनेत आज नवीन रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. मात्र, मृत्यूंची संख्या वाढली आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये गेल्या 24 तासात 1838 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर तब्बल 41 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात शहरात 1838 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 लाख 71 हजार 802 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 2812 रुग्णांची कोरोनाची दुसरी टेस्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 1 लाख 45 हजार 276 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरामध्ये सध्या 24 हजार 303 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

शहरामध्ये रुग्णसंख्या वाढत असताना मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. आज दिवसभरात 41 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामध्ये 25 रुग्ण शहरातील आहेत. तर 13 रुग्ण हद्दीबाहेरील आहेत. आजपर्यंत शहरामध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 3137 इतकी झाली आहे. यामध्ये शहरातील 2223 तर हद्दीबाहेरील 914 रुग्णांचा समावेश आहे. आज मृत्यू झालेले रुग्ण रावेत, बिजलीनगर, आकुर्डी, चिखली, मोशी, पिंपळे गुरव, पिंपरी, रहाटणी, निगडी, सांगवी, पुनावळे, चिंचवड, संत तुकारामनगर, अजमेरा, बोपखेल, बिबवेवाडी, हिंजवडी, जुन्नर, खडकी, धुमाळवाडी, धाणोरी, सिंहगड रोड, देहूगाव, कर्वेनगर, पुणे, वडगावशेरी, हडपसर, खराडी, देहूरोड, मुळशी येथील रहिवाशी आहेत. महापालिका आरोग्य विभागाने सांगितले की, आधी मृत्यू झालेल्या केसेस आज कळवण्यात आल्याने मृत्यूचा आकडा वाढला आहे. गेल्या 24 तासात 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.