Coronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक, जाणून घ्या आजची आकडेवारी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असल्याने कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. पिंपरी चिंचवड शहरामध्ये मागील काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहेत. मात्र, मागील दोन दिवसांत नवीन रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण कमी झाले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे दिलासा मिळाला आहे. परंतु याच दरम्यान शहरात मृतांचा आकडा वाढत असल्याने प्रशासनाची चिंता कायम आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये गेल्या 24 तासात 1517 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 3352 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 45 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती पिंपरी-चिंचवड माहानगरपालिका वैद्यकिय विभागाने दिला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज (बुधवार) दिवसभरात शहरात 1517 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 लाख 73 हजार 319 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 3352 रुग्णांची कोरोनाची दुसरी टेस्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 1 लाख 48 हजार 628 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरामध्ये सध्या 22 हजार 442 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

शहरामध्ये रुग्णसंख्या वाढत असताना मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. आज दिवसभरात 45 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामध्ये 26 रुग्ण शहरातील आहेत. तर 19 रुग्ण हद्दीबाहेरील आहेत. आजपर्यंत शहरामध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 3163 इतकी झाली आहे. यामध्ये शहरातील 2249 तर हद्दीबाहेरील 914 रुग्णांचा समावेश आहे. आज मृत्यू झालेले रुग्ण भोसरी, पिंपळे सौदागर, चिंचवड, प्रेमलोकपार्क, दिघी, पिंपरी, निगडी, वाकड, मोशी, विकासनगर, आकुर्डी, वाल्हेकरवाडी, थेरगाव, काळेवाडी, रहाटणी, पिंपळे गुरव, बोपखेल, चाकण, हडपसर, औंध, कर्वेनगर, शिरुर, खेड, पुणे, धानोरी, जानवडी, नारायणगाव, खडकी, कोंढवा येथील रहिवाशी आहेत.