Coronavirus : पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात कोरोनाचे 167 नवे पॉझिटिव्ह

पिंपरी/ पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मागील काही दिवसांपासून पिंपरी चिंचवड शहरात कोरोना (Corona) बाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण घटले आहे. शहरात नवीन रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण घटले असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. सध्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये 869 ॲक्टिव्ह (Active) रुग्ण असून त्यांच्यावर शहरातील कोव्हिड केअर सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत.

आज दिवसभरात शहरामध्ये 167 कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत तर 4 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 93 हजार 814 वर पोहचली आहे. आज 281 रुग्णांची दुसऱ्या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत 90 हजार 179 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरात रुग्णांची संख्या घटत असताना मृत्यूचे प्रमाण देखील कमी झाले आहे.

गेल्या 24 तासामध्ये शहरात कोरोनामुळे 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 1 रुग्ण पालिका हद्दीबाहेरील आहे तर 3 रुग्ण हे शहरातील आहेत. आज मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये पिंपरी, कासारवाडी, काळेवाडी, जुन्नर येथील रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत शहरात 2399 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून यामध्ये 1710 शहरातील तर 689 पालिका हद्दी बाहेरील आहेत.