Coronavirus : पिंपरी चिंचवड शहरात ‘कोरोना’चे 139 नवीन रुग्ण, 210 जणांना डिस्चार्ज

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहरात गेल्या 24 तासात 139 नवीन कोरोना (CoronaVirus) पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात 210 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकिय विभागाने दिली आहे.

गेल्या 24 तासात शहरामध्ये 139 कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 95 हजार 702 वर पोहचली आहे. आज 210 रुग्णांची दुसऱ्या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत 92 हजार 293 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरात रुग्णांची संख्या घटत असताना मृत्यूचे प्रमाण देखील कमी झाले आहे.

गेल्या 24 तासामध्ये शहरात कोरोनामुळे 7 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. यापैकी 4 पालिका हद्दीतील आहेत तर 3 हद्दीबाहेरील आहेत. आतापर्यंत शहरात 2458 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून यामध्ये 1741 शहरातील तर 717 पालिका हद्दी बाहेरील आहेत. शहरात मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये चिंचवड, पिंपळे गुरव, भोसरी, पुणे, राजगुरुनगर, दौंड येथील रहिवासी आहेत. सध्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये 700 रुग्ण अॅक्टिव्ह (Active) असून त्यांच्यावर शहरातील कोव्हिड केअर सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत. पिंपरी महापालिका हद्दीबाहेरील 97 रुग्णांवर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर पिंपरी चिंचवडमधील 56 रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.