Coronavirus : गेल्या 24 तासात पिंपरी-चिंचवडमध्ये 820 रूग्णांनी केली ‘कोरोना’वर मात, जाणून घ्या इतर आकडेवारी

पिंपरी / पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून राज्यातील मुंबई आणि पुण्यामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या जास्त आहे. पुणे शहराला लागून असलेल्या औद्योगिक नगरीमध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत असताना मृतांच्या संख्येत देखील वाढ होत आहे. त्यातच अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. रुग्ण वाढत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढत असल्याने दिलासा मिळाला आहे.

महानगर पालिका आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासामध्ये पिंपरी चिंचवड शहरात 943 नव्या रुग्णांची भर पडली आहे. यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 54 हजार 230 वर पोहचली आहे. शहरात आढळून आलेल्या 943 रुग्णांपैकी 941 रुग्ण शहरातील असून 2 रुग्ण शहराबाहेरील आहेत. शहराबाहेरील 885 रुग्णांवर सध्या पिंपरी चिंचवड शहरातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याच दरम्यान शहरात एकाच दिवशी 24 जणांचा कोरोनामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या 1131 इतकी झाली आहे. यामध्ये शहरातील 923 तर शहराबाहेरील 208 रुग्णांचा समावेश आहे. आज मृत्यू झालेल्या 24 रुग्णांमध्ये 14 रुग्ण शहरातील तर 10 रुग्ण शहराबाहेरील आहेत.

शहरामध्ये सध्या 6 हजार 101 रुग्ण अॅक्टिव्ह असून त्यांच्यावर शहरातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शहरातील 315 रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शहरात गेल्या 24 तासामध्ये 820 रुग्णांची दुसरी टेस्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत 45 हजार 496 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आली असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. शहरात गेल्या 24 तासात पुनावळे, काळेवाडी, चोविसावाडी, मोशी, चिंचवड, चऱ्होली, वाकड, दिघी, दापोडी, पिंपळे गुरव, खेड, इंदापुर, सुदउंबरे, अहमदनगर, मावळ, पुरंदर, चाकण, खडकी येथील रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.