दिलासादायक ! गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरात 1188 रुग्ण ‘कोरोना’मुक्त

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यात कोरोना बाधित रुग्मांची संख्या वाढत असताना पिंपरी चिंचवड शहरातील रुग्णवाढीचा दर गेल्या काही दिवसांपासून वेगाने वाढत आहे. शहरातील कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस फुगत चालला आहे. शहरात रुग्ण वाढत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे दिलासा मिळत आहे. असे असले तरी नागरिकांनी अधिक जबाबदारीने वागण्याचे आवाहन आरोग्य प्रशासनाकडून करण्यात आले आहे. गेल्या 24 तासामध्ये पिंपरी चिंचवड शहरात 1188 कोरोनाचे रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत शहरात 54 हजार 779 रुग्ण बरे झाले आहेत.

पिंपरी चिंचवड मनपा आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज शहरामध्ये 997 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 65 हजार 379 एवढी झाली आहे. आज आढळून आलेले सर्व रुग्ण शहरातील आहे. शहराबाहेरील 1195 रुग्णांवर शहरातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच शहरातील 411 रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याच दरम्यान 16 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये 9 रुग्ण शहरातील आहेत तर 7 रुग्ण शहराबाहेरील आहेत. शहरातील मृतांचा आकडा 1369 वर पोहचला आहे. यामध्ये 1065 रुग्ण शहरातील तर 304 रुग्ण शहराबाहेरील आहेत.

सध्या शहरामध्ये 6407 रुग्ण ॲक्टिव्ह असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. आज शहरामध्ये निगडी, बिजलीनगर, विद्यानगर, पिंपळे गुरव, काळेवाडी, चिंचवडगांव, संभाजीनगर, देहूरोड विकासनगर, चाकण, देहूगांव, कराड, कामशेत, मारुंजी, माहुर, राजगुरुनगर येथील रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.