Coronavirus : चिंताजनक ! पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसभरात 1024 ‘कोरोना’चे नवे पॉझिटिव्ह तर 10 जणांचा मृत्यू

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. शहरामध्ये मागील काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये आज दिवसभरात 1024 रुग्णांची कोरोनाची चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. शहरामध्ये संक्रमित रुग्णांसोबत मृतांचा आकडा देखील वाढत आहे. आज दिवसभरात 10 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पिंपरी चिंचवड मनपा आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज शहरामध्ये 1024 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 17 हजार 264 एवढी झाली आहे.

आज आढळून आलेल्या 1024 रुग्णांमध्ये 981 रुग्ण शहरातील तर 43 रुग्ण शहराबाहेरील आहे. यांच्यासह 302 रुग्णांवर शहरातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच शहरातील 39 रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याच दरम्यान 10 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये 8 रुग्ण शहरातील आहेत तर 2 रुग्ण शहराबाहेरील आहेत. शहरातील मृतांचा आकडा 369 वर पोहचला आहे.

यामध्ये 292 रुग्ण शहरातील तर 77 रुग्ण शहराबाहेरील आहेत. शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. आज दिवसभरात 699 रुग्णांची कोरोनाची दुसरी चाचणी निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत 11 हजार 530 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या शहरामध्ये 3451 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. आज शहरामध्ये सांगवी, यमुनानगर, पिंपरी, भोसरी, मोशी, थेरगाव, मुळशी, येरवडा येथील रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.