Coronavirus : पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसभरात ‘कोरोना’चे 721 नवीन रुग्ण तर 12 जणांचा मृत्यू

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असताना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या देखील वेगाने वाढत आहे. शहरामध्ये सध्या पाच हजारापेक्षा अधिक ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तर कोरोना बाधित रुग्णांची संख्या तीस हजाराच्या जवळ पोहचली आहे. रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असतानाच रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. याचवेळी उपचारादरम्यान रुग्ण दगावण्याचे प्रमाण वाढले आहे. आज दिवसभरात पिंपरी चिंचवड शहरात 721 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर 12 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत कोरोनामुळे 613 जणांचा मृत्यू झाला आहे.

पिंपरी चिंचवड मनपा आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरामध्ये 721 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 29 हजार 836 एवढी झाली आहे. आज आढळून आलेल्या 721 रुग्णांपैकी 679 रुग्ण शहरातील आहेत. आज शहराबाहेरील 42 रुग्ण आढळून आले आहेत. तर पिंपरी चिंचवड शहरात उपचार घेणारे परंतु हद्दीबाहेरील 428 रुग्णांवर शहरातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच शहरातील 58 रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याच दरम्यान 12 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरातील मृतांचा आकडा 613 वर पोहचला आहे. यामध्ये 496 रुग्ण शहरातील तर 117 रुग्ण शहराबाहेरील आहेत.

शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. आज दिवसभरात 944 रुग्णांची कोरोनाची दुसरी चाचणी निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत 21 हजार 208 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या शहरामध्ये 5146 रुग्ण ॲक्टिव्ह असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. आज शहरामध्ये इंद्रायणीनगर, भोसरी, पिंपळे गुरव, चिंचवडगाव, रुपीनगर, देहूगाव, निगडी, चिखली, पिंपरी, संभाजीनगर, सांगवी येथील रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.