Coronavirus : पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसभरात 871 नवीन रुग्ण, 797 ‘कोरोना’मुक्त

पिंपरी/पुणे :  पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. शहरामध्ये मागील काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मात्र शनिवारी (दि.1) दिलासादयक आकडेवारी समोर आली होती. यानंतर आज (रविवारी) देखील दिलासा देणारी आकडेवारी समोर आली आहे. आज दिवसभरात पिंपरी चिंचवड शहरात 797 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात 871 रुग्णांची कोरोनाची चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. आज दिवसभरात 8 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून मृतांची संख्या 447 वर पोहचली आहे.

पिंपरी चिंचवड मनपा आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज शहरामध्ये 871 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 22 हजार 934 एवढी झाली आहे. आज आढळून आलेले 871 रुग्ण शहरातील आहेत. शहराबाहेरील एकही रुग्ण आज आढळून आला नसून सध्या शहराबाहेरील 308 रुग्णांवर शहरातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच शहरातील 39 रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याच दरम्यान 8 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये 6 रुग्ण शहरातील आहेत तर 2 रुग्ण शहराबाहेरील आहेत. शहरातील मृतांचा आकडा 447 वर पोहचला आहे. यामध्ये 355 रुग्ण शहरातील तर 92 रुग्ण शहराबाहेरील आहेत.

शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. आज दिवसभरात 797 रुग्णांची कोरोनाची दुसरी चाचणी निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत 15 हजार 479 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या शहरामध्ये 3704 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. आज शहरामध्ये पिंपळे गुरव, काळेवाडी, चिखली, भोसरी, पिंपरी, चिंचवड, आळंदी, पुणे येथील रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.