Coronavirus : पिंपरी-चिंचवडमध्ये ‘कोरोना’चा हाहाकार ! गेल्या 24 तासात 14 जणांचा मृत्यू तर 449 नवे पॉझिटिव्ह

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना बाधित रुग्णांच्या संख्या वाढत असताना आज एका दिवसात 14 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात 449 नवीन कोरोना बाधित रुग्णांची भर पडली असून शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 8603 इतकी झाली आहे. वाढत्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या वाढत असून शहरात 5 हजार रुग्ण बरे झाले आहेत.

पिंपरी चिंचवड मनपा आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज शहरामध्ये 449 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. यामध्ये 17 रुग्ण शहराबाहेरील असून त्यांच्यासह 256 रुग्णांवर शहरातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर शहरातील 15 रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शहरात एकाच दिवशी 15 जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये एक रुग्ण शहराबाहेरील आहे. शहरात एकूण मृतांचा आकडा 188 वर पोहचला असून यामध्ये शहरातील 143 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर शहराबाहेरील 45 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. आज शहरामध्ये 356 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत 5235 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. शहरात सध्या 1957 रुग्ण अॅक्टिव्ह असून त्यांच्यावर शहरातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आज रहाटणी, भोसरी, कासारवाडी, निगडी, दापोडी, पिंपरी, थेरगांव, चिंचवड, पिंपरीगांव, औंधरोड येथील रुग्णांचा मृत्यू झाला आहे.