Coronavirus : चिंताजनक ! पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे तब्बल 41 बळी, जाणून घ्या इतर आकडेवारी

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पिंपरी चिंचवड शहरात देखील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असताना मृत्यूचा आकडा देखील वाढत आहे आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये तब्बल 41 कोरोनाचे रुग्णांचा मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत शहरात कोरोनामुळे 1265 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 1008 शहरातील आहेत तर 257 रुग्ण शहराबाहेरील आहे. आज मृत्यू झालेल्या रुग्णामध्ये 28 जण शहरातील आहेत. तर 13 मनपा हद्दीबाहेरील आहे. दरम्यान आज नोंद करण्यात आलेल्या 41 मृत्यू पैकी 20 मृत्यू हे 1 तारखेपासूनचे असून आज मृत्यूंची आकडेवारी अपडेट करण्यात आली असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिला आहे.

महानगर पालिका आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासामध्ये पिंपरी चिंचवड शहरात 1331 नव्या रुग्णांची भर पडली आहे. यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 61 हजार 231 वर पोहचली आहे. शहरात आढळून आलेल्या रुग्णांपैकी 1265 हे शहरातील असून 66 रुग्ण हद्दीबाहेरील आहेत. शहराबाहेरील 1046 रुग्णांवर सध्या पिंपरी चिंचवड शहरातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याच दरम्यान शहरात एकाच दिवशी 41 जणांचा कोरोनामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

शहरामध्ये सध्या 6 हजार 486 रुग्ण अॅक्टिव्ह असून त्यांच्यावर शहरातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शहरातील 339 रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. आज शहरात 1272 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत 49 हजार 923 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. शहरात गेल्या 24 तासात भोसरी, वाकड, थेरगाव, संत तुकाराम नगर, मोशी, काळेवाडी, पिंपरी, चिंचवड, सांगवी, दापोडी, दिघी, वाल्हेकरवाडी, पिंपळे निलख, पिंपळे गुरव, यमुनानागर, येरवडा, कसबा पेठ, खाकुडी बु., शिवणे, खेड, हडपसर, जुन्नर, कर्वेनगर, सातारा, चंदननगर, लोणावळा येथील रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.