Coronavirus : पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 1021 नवे पॉझिटिव्ह

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्यात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पिंपरी चिंचवड शहरात देखील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. आज पिंपरी चिंचवड शहरातून दिलासादायक आकडेवारी समोर आली आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये तब्बल 5581 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत शहरात 43 हजार 777 रुग्ण बरे झाले आहेत. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची आकडेवारी अपडेट करण्यात आली आहे. त्यामुळे रुग्ण बरे झालेल्याची आजची संख्या जास्त असल्याचे पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवी यांनी सांगितले

महानगर पालिका आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासामध्ये पिंपरी चिंचवड शहरात 1021 नव्या रुग्णांची भर पडली आहे. यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 52 हजार 284 वर पोहचली आहे. शहरात आढळून आलेल्या 1021 रुग्णांपैकी 977 रुग्ण शहरातील असून 44 रुग्ण शहराबाहेरील आहेत. शहराबाहेरील 1031 रुग्णांवर सध्या पिंपरी चिंचवड शहरातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याच दरम्यान शहरात एकाच दिवशी 20 जणांचा कोरोनामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या 1093 इतकी झाली आहे. यामध्ये शहरातील 891 तर शहराबाहेरील 202 रुग्णांचा समावेश आहे. आज मृत्यू झालेल्या 20 रुग्णांमध्ये 12 रुग्ण हे मनपा हद्दीतील आहेत तर 8 रुग्ण हे हद्दीबाहेरील आहेत.

शहरामध्ये सध्या 5 हजार 725 रुग्ण अॅक्टिव्ह असून त्यांच्यावर शहरातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शहरातील 283 रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. शहरात गेल्या 24 तासात पिंपळे सौदागर, नेहरुनगर, चिखली, भोसरी, पिंपळे निलख, निगडी, चिंचवड, रुपीनगर, मोशी, खेड, कामशेत, मंचर, वाघोली, विश्रांतवाडी, लोणावळा येथील रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवी यांनी सांगितले की, मागील काही दिवसांपासून कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची आकडेवारी प्राप्त झाल्याने आज कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण आकडेवारी अपडेट करण्यात आली आहे. मागील काही दिवसातील कोरोनामुक्त रुग्ण आणि आजचे कोरोनामुक्त रुग्णांची संख्या दिल्याने कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या जास्त दिसत आहे.