Coronavirus : पिंपरी-चिंचवडमध्ये ‘कोरोना’चं थैमान, गेल्या 24 तासात विक्रमी 927 नवे पॉझिटिव्ह तर 15 जणांचा मृत्यू

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. शहरामध्ये मागील काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात लॉकडाऊन करण्यात आले. मात्र, लॉकडाऊनचा काहीही परिणाम झालेला दिसून येत नसून दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. आज दिवसभरात शहरामध्ये 927 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर 15 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

पिंपरी चिंचवड मनपा आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात शहरामध्ये 927 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 13 हजार 107 एवढी झाली आहे. आज आढळून आलेल्या 927 रुग्णांमध्ये 886 रुग्ण शहरातील तर 41 रुग्ण शहराबाहेरील आहे. यांच्यासह 282 रुग्णांवर शहरातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच शहरातील 51 रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याच दरम्यान 15 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये 12 रुग्ण शहरातील आहेत तर 3 रुग्ण शहराबाहेरील आहेत. शहरातील मृतांचा आकडा 301 वर पोहचला आहे. यामध्ये 238 रुग्ण शहरातील तर 63 रुग्ण शहराबाहेरील आहेत.

शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. आज दिवसभरात 203 रुग्णांची कोरोनाची दुसरी चाचणी निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत 8014 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या शहरामध्ये 3379 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. आज शहरामध्ये काळेवाडी, नेहरूनगर, आकुर्डी, थेरगांव, वाल्हेकरवाडी, पिंपळे गुरव, पुनावळे, मोरवाडी, रहाटणी, जुन्नर, चाकण, स्वारगेट येथील रहिवाशी असलेल्या आणि शहरात उपचार घेणाऱ्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.