Coronavirus : पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात 753 ‘कोरोना’मुक्त !

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. शहरामध्ये मागील काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात लॉकडाऊन करण्यात आले. मात्र, लॉकडाऊन काळातही रुग्णांची संख्या वेगाने वाढली. गेल्या 24 तासामध्ये शहरात 683 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर 9 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

पिंपरी चिंचवड मनपा आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री 7 ते रविवारी रात्री 9 पर्यंत शहरामध्ये 683 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 16 हजार 283 एवढी झाली आहे. आज आढळून आलेल्या 683 रुग्णांमध्ये 651 रुग्ण शहरातील तर 32 रुग्ण शहराबाहेरील आहे. यांच्यासह 299 रुग्णांवर शहरातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच शहरातील 36 रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याच दरम्यान 9 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये 8 रुग्ण शहरातील आहेत तर 1 रुग्ण शहराबाहेरील आहेत. शहरातील मृतांचा आकडा 359 वर पोहचला आहे. यामध्ये 284 रुग्ण शहरातील तर 75 रुग्ण शहराबाहेरील आहेत.

शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. आज दिवसभरात 753 रुग्णांची कोरोनाची दुसरी चाचणी निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत 10911 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या शहरामध्ये 3427 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. आज शहरामध्ये वाकड, वाल्हेकरवाडी, निगडी, चिंचवड, चिखली, मोरवाडी, पाषाण येथील रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.