Coronavirus : पिंपरी-चिंचवडमध्ये 24 तासात ‘कोरोना’चे 497 नवे पॉझिटिव्ह तर 8 जणांचा मृत्यू, 168 जण झाले बरे

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याने प्रशासनाने लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. आज दिवसभरात शहरामध्ये 497 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर 8 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आज नव्याने आढळून आलेल्या कोरोना बाधित रुग्णांमध्ये शहराबाहेरील 9 रुग्णांचा समावेश आहे. कोरोना बाधित रुग्णांची दुसरी टेस्ट निगेटिव्ह आली आहे अशा 168 रुग्णांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले असून शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 6549 वर पोहचली आहे. आज एकाच दिवशी शहरातील 8 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरातील 95 आणि शहराबाहेरील 36 रुग्णांचा मृत्यू झाला असून शहरातील मृतांची संख्या 131 झाली आहे. शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. आज दिवसभरात 168 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून अतापर्यंत 3849 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

आज शहरामध्ये महापालिका हद्दी बाहेरील 9 जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या रुग्णांसह 212 रुग्णांवर शहरातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शहरामध्ये सध्या 2577 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आज शहरातील नेहरुनगर मधील 2, चिंचवडेनगर, पिंपरीगांव, पिंपळे गुरव, आनंदनगर चिंचवड, इंद्रायणीनगर भोसरी, मोरेवस्ती चिखली येथील रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 4 पुरुष आणि 4 महिलांचा समावेश आहे.