पिंपरी-चिंचवडमध्ये ‘स्टेट्स’साठी धडपडावं लागणार, पोलिस ठाण्याच्या पातळीवरील ‘अर्थ’कारणाला पोलिस आयुक्तांकडून ‘चाप’

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन (अमोल येलमार ) – स्वतःच्या सुरक्षेसाठी स्वतःजवळ शस्त्र बाळगता येते. मात्र त्यासाठी पोलिसांकडून शस्त्र परवाना घ्यावा लागतो. त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करुन आपण सांगितलेले कारण योग्य असल्याचे स्पष्ट करावे लागते. मात्र काही दिवसांपासून पिस्तूल (शस्त्र) परवाना मिळवणे फारच सोपे झाले होते कारण यामध्ये मोठ्या प्रमाणावर ‘अर्थ’कारण आले होते. या ‘अर्थ’ कारणास पिंपरी चिंचवडचे नवीन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी चाफ लावायचे ठरवले आहे.

कोणाकडून धोका असेल, मौल्यवान वस्तूची ने-आण करणाऱ्या व्यक्तींना शस्त्र परवाना पोलीसांकडून, शासनाकडून दिला जातो. हा परवाना मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतात. यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे आपण शस्त्र परवाना नक्की कोणत्या कारणासाठी मागत आहोत हे कारण योग्य असेल, शस्त्र परवाना मागणाऱ्याच्या जीवाला धोका असेल तर शस्त्र परवाना दिला जातो.

मात्र काही वर्षांपासून शस्त्र बाळगणे हे एक ‘स्टेट्स’ झाले आहे. आपल्याही कंबरेला पिस्तूल असावे यासाठी प्रत्येक जण लाखो रुपये मोजण्याची तयारी दाखवतात. याच मानसिकतेचा फायदा काही पोलीस उचलतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शस्त्र परवाना देण्यास हरकरत नसावी असे शेरे अधिकाऱ्यांचे येतात. मात्र यामध्ये गरजू व्यक्तींना मात्र मिळत नाही.

आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी याचा अभ्यास करुन पोलीस स्टेशन पातळीवर होत असलेले अर्थकारण थांबविण्यासाठी कडक निर्णय घेतला आहे. शस्त्र पर्वानासाठी आलेल्या कोणत्याही अर्जावर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व इतर अधिकारी आपला शेरा मारु शकणार नाहीत. ते फक्त अर्जदाराने सांगीतलेल्या कारणांची चौकशी करुन, त्यांना कितपत धोका आहे याचा अहवाल पोलीस आयुक्त कार्यलयास पाठवतील; असे आदेश विशेष शाखेच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.

शस्त्र परवाना देताना होणारे ‘अर्थ’ कारण थांबविण्यासाठी पोलीस आयुक्त स्वतः त्या अर्जावर निर्णय घेणार आहे. त्यांना शस्त्र परवाना द्यावा की नाही असा शेरा देण्याचा अधिकार यापुढे वरिष्ठ पोलीस निरीक्षकाना नसणार आहे. यामुळे पोलीस ठाणे पातळीवर मोठ्या प्रमाणावर ‘अर्थ’ कारण होणाऱ्या एका प्रकारावर चाफ आणला आहे, असे म्हणता येईल. यामुळे अनेक शस्त्र परवाना मिळवून देणाऱ्या दलालांवरही आळा बसणार आहे.