विनयभंगाची तक्रार घेण्यास टाळाटाळ ; सहाय्यक पोलिस निरीक्षकासह दोन पोलिस निलंबीत

इतर 3 कर्मचारी नियंत्रण कक्षाशी संलग्‍न

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – तक्रार देण्यास पोलिस ठाण्यात गेल्यानंतर तक्रारदारास सौजन्यपुर्ण वागणुक द्या असे आदेश वेळावेळी वरिष्ठ पोलिस अधिकारी देत असतात. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून कनिष्ठ अधिकारी आपल्या मर्जीसारखे वागतात. तसेच काहीसे पिंपरी पोलिस आयुक्‍तालयाच्या हद्दीत घडले आहे. अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाची तक्रार घेण्यास एका सहाय्यक पोलिस निरीक्षकासह दोन पोलिस कर्मचार्‍यांनी टाळाटाळ केली. प्रकरण पोलिस आयुक्‍तांकडे गेले आणि पोलिस आयुक्‍तांनी तिघांना तडकाफडकी निलंबीत केले.

सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश जगदाळे, पोलिस कर्मचारी दत्‍तात्रय माळवदकर आणि राजेंद्र किरवे अशी निलंबीत करण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहे. त्याबाबतचे आदेश पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्‍त आर. के. पद्मनाभन यांनी शनिवारी रात्री उशिरा निर्गमित केले आहेत. सहाय्यक निरीक्षकासह तिघांना निलंबीत केल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी 3 पोलिस कर्मचार्‍यांना तात्काळ नियंत्रण कक्षाशी संलग्‍न करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, चिखली पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन (14 वर्ष) मुलीचा विनयभंग झाला होता. त्याबाबतची तक्रार देण्यासाठी मुलीचे वडिल अनेकवेळा पोलिस चौकीत गेले. पोलिस चौकीत हजर असलेल्या पोलिस अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केली. शेवटी पिडीत मुलीच्या वडिलांनी थेट पोलिस आयुक्‍त आर.के. पद्मनाभन यांची भेट घेवुन हकीकत सांगितली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेवुन आयुक्‍तांनी प्रकरणाची चौकशी चालु केली. पोलिस अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी हालगर्जीपणा केल्याचे निदर्शनास आल्याने पोलिस आयुक्‍तांनी सहाय्यक पोलिस निरीक्षकासह दोन पोलिस कर्मचार्‍यांना तात्काळ निलंबीत केले तर इतर 3 पोलिस कर्मचार्‍यांना तात्काळ कंट्रोल रूमला संलग्‍न करण्यात आले आहे. पोलिस आयुक्‍तांनी ठोस भुमिका घेवुन निलंबनाची कारवाई केल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे.