Pimpri News : उद्योगनगरीतील प्रवाशांनी घेतला नव्या स्ट्रेनचा धसका, पासपोर्ट अर्जाचे प्रमाण निम्म्यावर

पिंपरीः पोलीसनामा ऑनलाईन – कोरोनाची दुसरी लाट अन् त्यापाठोपाठ ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा विषाणू आढळल्याने जगभरात काळजी घेतली जात आहे. भारतात देखील नव्या कोरोना विषाणुचे 6 रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे भारतीयांनी धसका घेतला असून परदेशात जाण्याचे टाळले जात आहे. अत्यावश्यक काम असेल तरच विमान प्रवास करण्यावर भर दिला जात आहे. परिणामी नवीन पारपत्र अर्थात पासपोर्ट घेण्याचे प्रमाण घटले आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या पडताळणी विभागाकडून गेल्या वर्षी म्हणजे (2020) मध्ये केवळ 32, 664 तर, 2019 मध्ये 67,530 पडताळणी करण्यात आली आहे.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर देशात गेल्यावर्षी मार्चपासून लाॅकडाऊन केला होता. त्यामुळे देशातील विमानसेवा बंद केली होती. मात्र लाॅकडाऊन शिथील केल्यानंतर पासपोर्टसाठीची ऑनलाईन प्रक्रिया सुरू केली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातून हजारो नागरिक दरवर्षी परदेशवारी करतात. तसेच लाखो नागरिक पासपोर्टसाठी अर्ज करतात. लाॅकडाऊन शिथिल झाल्यानंतर त्यात वाढ झाली असली तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी संख्येने अर्ज प्राप्त होत आहेत. हे प्रमाण निम्म्यावर आले आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय 15 ऑग़स्ट 2018 रोजी कार्यान्वित झाल्यानंतर विशेष शाखेअंतर्गत पडताळणी विभागाचे कामकाज सुरू झाले. गेल्यावर्षी जानेवारीमध्ये सर्वाधिक 6937 पासपोर्ट अर्ज होते. लाॅकडाऊन दरम्यान एप्रिलमध्ये केवळ एक तसेच मेमध्ये 23 तर अनलाॅक झाल्यानंतर त्यात वाढ होत असून, डिसेंबरमध्ये 3913 अर्ज प्राप्त झाले होते.

पासपोर्ट अर्ज पडताळणी (2020)
जानेवारी 6934
फेब्रुवारी 5827
मार्च 3755
एप्रिल 1
मे 23
जून 948
जुलै 1282
ऑगस्ट 1914
सप्टेंबर 2627
आक्टोबर 2901
नोव्हेंबर 2503
डिसेंबर 3913
एकूण-32664