Coronavirus : पिंपरी-चिंचवडला आणखी 5 कोरोनाग्रस्त रुग्ण, राज्यात कोरोनाचे 31 रुग्ण तर, देशात ‘शंभरी’पार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यात ‘कोरोना’ची लागण झालेल्यांच्या संख्येत शनिवारी कोणतीही वाढ झाली नसली तरी पिंपरी चिंचवडमध्ये आणखी ५ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या १५ झाली आहे.  यात दुबईच्या सहलीवरुन आलेल्यांच्या संपर्कातील चौघांचा, तर थायलंडवरुन आलेल्या एकाचा समावेश आहे, हे सर्व पिंपरी चिंचवडचे रहिवासी आहेत. त्यांच्यावर पिंपरी चिंचवडमधील वाय सीएम रुग्णालयात स्वतंत्र कक्षात ठेवण्यात आले आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दिलीप म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी दिली.

वायसीएम रुग्णालयात स्वतंत्र कक्षात ठेवण्यात आलेल्यांमध्ये ३ महिला व २ पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये थायलंडवरुन परतलेल्या २१ वर्षाच्या तरुणाचा समावेश आहे. या सर्वांचे तपासणीसाठी पाठविलेले नमूने पॉझिटिव्ह आले असल्याचा अहवाल शनिवारी रात्री उशिरा मिळाले. दरम्यान, या अगोदर लागण झालेल्या १० जणांची प्रकृती स्थिर आहे. एनआयव्हीकडे पाठविण्यात आलेले नमून्यांपैकी २३ जणांचे नमूने निगेटिव्ह आले आहेत.

पिंपरी चिंचवडमधील संशशित ४१ पैकी २५ जणांचे रिपोर्ट आले असून त्यामध्ये ५ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. आणखी १६ संशयितांचे रिपोर्ट येण्याचे बाकी आहेत, असे पिंपरी चिंचवडचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली. दुबई येथील प्रवासाला गेलेल्या ४० जणांच्या ग्रुपमधील ४ जणांना नव्याने लागण झाली आहे. त्यातील प्रत्येकी एक जण नगर, मुंबईतील असून दोघे यवतमाळ येथील आहेत.