लोणावळा उपनिबंधकास खासगी व्यक्तीसह 25 हजाराची लाच घेताना अटक, प्रचंड खळबळ

लोणावळा : पोलीसनामा ऑनलाइन – विकत घेतलेल्या जमिनीची (Land) खरेदी नोंद करण्यासाठी लोणावळा (Lonavala) दुय्यम निबंधक कार्यालयात तक्रारदाराकडे 30 हजार रुपयांची मागणी करण्यात आली. त्यानंतर तडजोड करून हि रक्कम २५ हजार करण्यात आली. ती रोकड एका व्यक्ती द्वारे स्विकारल्याप्रकरणी दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (Anti Corruption Bureau) रंगेहाथ पकडले आहे.. बुधवारी सायंकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून हि कारवाई करण्यात आली.

लोणावळा दुय्यम निबंधक कार्यालयातील उपनिबंधक आर.जे.भोसले ( R.J.Bhosale) व खाजगी इसम रमेश आंद्रे ( Ramesh Aandre) यांना याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक (Arrest) करण्यात आले. वाकसई देवघर ग्रामपंचायत हद्दीमधील एका जागेची खरेदी नोंद घालण्यासाठी लोणावळा येथील कार्यालयातील उपनिबंधक आर.जे.भोसले हे पैशाची मागणी करत होते. पैशाच्या मागणीमुळे ते नोंद करण्यास विलंब करत होते.

या त्रासाला कंटाळून तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर लाचलुचपत विभागाचे पोलीस अधिक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधिक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रकांत चौधरी, पोलीस हवालदार मुस्ताक खान, पोलीस शिपाई किरण चिमटे, माळी यांच्या पथकाकडून सापळा रचून त्यांना रंगेहाथ पकडले.