पिंपरी-चिंचवड पालिका आयुक्तांच्या बदलीची शिवसेनेची मागणी

पुणे/पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – महापालिकेचे निष्क्रिय आयुक्त श्रावण हर्डीकर यांची त्वरित बदली करावी, अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. दरम्यान दोन दिवसांपूर्वी काँग्रेसकडूनही आयुक्तांच्या बदलीची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे आयुक्तांवर बदलीची टांगती तलवार असून त्यांच्या जागी तुकाराम मुंढे येणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे.

शिवसेना जिल्हाध्यक्ष गजानन चिंचवडे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवदेनात म्हटले आहे की, आयुक्तांची आजपर्यंतची वाटचाल ही निष्क्रिय राहिली. संशयास्पद व वादग्रस्त कचरा निविदाप्रक्रिया, स्वच्छ भारत सर्व्हेक्षणात महापालिकेची घसरण झाली. 24 तास पाणी पुरवठा योजना फसली. वारंवार पाणी कपातीचे धोरण, ठेकेदारांना मुदतवाढ दिली आहे. 31 मार्च 2017 च्या आगोदरच्या ठेकेदारांच्या बिलाबाबत योग्य वेळी निर्णय घेतला नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

तसेच वायसीएम, वैद्यकीय सेवेचा बोजवारा, विविध विभागातील वर्षानुवर्षे ठाण मांडलेल्या अधिकाऱ्यांना अभय, हॉकर्स झोन धोरण अंमलबजावणीत अपयश, विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना दुजाभावाची वागणूक दिली. त्यामुळे भविष्यात विकसित शहर म्हणून पुढे नेण्यासाठी आयुक्तांची बदली होणे गरजेचे असल्याच चिंचवडे यानी आपल्या निवेदनात म्हटले आहे.