Coronavirus : पिंपरी-चिंचवड महापालिकेचा मोठा निर्णय ! ‘हॉटस्पॉट’ भागावर ठेवणार ‘ड्रोन’ने ‘वॉच’

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये मागील काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत असल्याने चिंता वाढली आहे. कोरोना बाधितांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून अनेक उपाय योजना केल्या जात आहेत. आता पिंपरी चिंचवड पालीकेने मोठा निर्णय घेतला असून शहरातील हॉटस्पॉट भागावर ड्रोनच्या मदतीने नजर ठेवली जाणार आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील हॉटस्पॉटवर आता ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्याचबरोबर शहरातील इतर सार्वजनिक ठिकाणी देखील ड्रोनच्या माध्यमातून नागरिकांवर नजर ठेवली जाणार असल्याचे पिंपरी चिंचवड महानगर पालिका आयुक्त श्रावण हार्डीकर यांनी सांगितले. तसेच नागरिक नियमांचे पालन करत नसल्याचे आढळून आल्यास तो परिसर तीन दिवसांसाठी सील केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
आयुक्तांनी सांगितले की, आनंद नगर, दापोडी, नेहरू नगर, भाटनगर, बौद्ध नगर, रमाई नगर, साईबाबा नगर, दिघी हे परिसर हॉटस्पॉट असल्याने इथे अधिक सतर्कता बाळगून ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे. त्याच बरोबर पोलिसांचा बंदोबस्त अधिक तैनात करण्यात येणार असल्याचे श्रावण हार्डीकर यांनी सांगितले.

दरम्यान, अनलॉक 1 नंतर शहरांमधील लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणली जात आहे. यामुळे नागरिकांनी बाहेर पडणं शक्य झालं आहे. मात्र, याचवेळी आता पुणे, पिंपरी-चिंचवड या भागातील कोरोना बाधित रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. याच पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालीका प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नागरिकांना वारंवार आवाहन करून देखील नागरिकांकडून सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन होताना दिसून आले नाही. त्यामुळे क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकारी आणि सहायक आयुक्त स्मिता झगडे यांनी पिंपरी मधील मुख्य बाजारपेठ तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेत आदेश काढला.