गटनेते तथा सभागृहनेतेपदी नामदेव ढाके यांची निवड निश्चित

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या गटनेते तथा सभागृहनेतेपदी नामदेव ढाके यांची निवड करण्यात येणार असून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या शिफारशीचे पत्र पुण्याच्या विभागीय आयुक्तांना देण्यात आले आहे. याबाबतची माहिती भाजप शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांनी आज (बुधवारी) दिली. या फेरबदलाला विभागीय आयुक्तांनी मान्यता दिल्यानंतर महापौर उषा ढोरे यांच्या पत्रानंतर अधिकृतपणे ढाके यांची सभागृहनेतेपदी निवड होणार आहे.

फेब्रुवारी 2017 मध्ये महापालिकेत भाजपची सत्ता आल्यापासून जुने आणि भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते एकनाथ पवार यांच्याकडे सभागृह नेतेपदाची धुरा होती. तीन वर्ष त्यांनी सक्षमपणे कामकाज केले. मात्र पवार यांनी सोमवारी (दि. 10) तडकाफडकी राजीनामा दिला. भाजपच्या बैठकीत ढाके यांच्या नावावर एकमत करण्यात आले. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या शिफारशीचे पत्र पुण्याचे विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्हैसेकर यांना दिले आहे. विभागीय आयुक्तांचे पत्र येताच महापौर उषा ढोरे या ढाके यांना पत्र देतील. त्यानंतर ढाके यांची अधिकृतरित्या सभागृहनेतेपदी नियुक्ती होईल.ऑ

प्रभाग क्रमांक 17 वाल्हेकरवाडी, चिंचवडेनगर, बिजलीनगरमधून ढाके पहिल्यांदाच निवडून आले आहेत.