पिंपरी चिंचवडच्या एका पोलिसाला ‘कोरोना’ची लागण

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात कार्यरत असलेल्या एका पोलिसाला कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. राज्यात अनेक ठिकाणच्या एक हजाराहून अधिक पोलिसांना करोनाची लागण झाली आहे. त्यापैकी काही जणांचा मृत्यू देखील झाला आहे. मात्र पिंपरी चिंचवड पोलीस दल यापासून दूर होते. कर्मचाऱ्यांना करोनाची लागण होऊ नये म्हणून विविध साधन सामुग्रीसह प्रतिकार शक्‍ती वाढविणाच्या गोळ्या, पेय देण्यात आली. एवढेच नव्हे तर संशयित रुग्ण आणि 50 वर्षावरील सर्व पोलिसांच्या तपासण्याही करण्यात आल्या. मात्र या सर्व तपासण्यास निगेटिव्ह आल्याचे पोलीस अधिकारी अगदी अभिमानाने सांगत होते.

मात्र गुरूवारी केलेल्या तपासणीत एकजण करोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला. यामुळे शहर पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. आत्ता त्याच्या पोलिसांच्या संपर्कात कोण कोण आले याचा शोध सुरू आहे. काही दिवसांपूर्वी पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका महिला आरोपीला सातारा येथील तुरुंगात नेण्यात आले होते. या आरोपीला करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. यामुळे त्या महिला आरोपीच्या संपर्कात आलेल्या पोलिसांना कॉरन्टाइन करण्यात आले होते. तर पुण्यातील एका पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या परंतु पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्‍तालयाच्या हद्दीत राहणाऱ्या दोन पोलिसांना लागण झाली होती.