एका चोरट्याकडून पावणे सात लाखाचे 70 मोबाईल जप्त; गुन्हे शाखेची कामगिरी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – उघडा दरवाजा पाहून घरात घुसून, घरातील मोबाईल चोरणाऱ्या सराईत चोरट्यास गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून तब्बल सहा लाख ७२ हजार रुपयांचे महागडे ७० मोबाइल पोलिसांनी जप्त केले आहेत.

शिवराज बाळासाहेब वाघोले (१९, रा. मु. पाचाणे, पो. चांदखेड, ता. मावळ, जि. पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. चोरीचे मोबाइल विक्री करण्यासाठी एकजण आंबी चौक, तळेगाव या ठिकाणी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अप्पर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक आयुक राजाराम पाटील, श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली, गुन्हे शाखा युनिट पाचचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, सहाय्यक निरीक्षक राम गोमारे, कर्मचारी दयानंद खेडकर, राजकुमार इघारे, फारूक मुल्ला, संदीप ठाकरे, ज्ञानेश्वर गाडेकर, धनंजय भोसले, दत्तात्रय बनसुडे, धनराज किरनाळे, स्वामीनाथ जाधव, भरत माने, श्यामसुंदर गुट्टे, गोपाल ब्रम्हांदे यांच्या पथकाने सापळा रचला.

संशयित आरोपी वाघोले याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या पिशवीची झडती घेतली असता त्यात ३० मोबाइल आढळून आले. पोलिसांनी त्याला याबाबत विचारणा केली असता सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने हे मोबाइल चोरी केल्याची कबुली दिली. आरोपी वाघोले याला गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणून अधिक चौकशी केली असता त्याने चोरीचे आणखी ४० मोबाइल आपल्या घरी असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी त्याच्या घरी जाऊन मोबाईल हस्तगत केले.