पिंपरी-चिंचवड पोलीस दलात मोठे फेरबदल, 399 पोलीस शिपाई ते सहाय्यक फौजदार यांच्या बदल्या

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन –   पिंपरी चिंचवड पोलीस दलात सोमवारी उशिरा मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सर्वच पोलीस ठाणे, वाहतूक शाखा आणि मुख्यालय येथील 399 पोलीस शिपाई ते सहाय्यक फौजदार यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये अनेक प्रस्थापित कर्मचारी, डीबी (तपासी पथक) चे कर्मचारी यांच्या बदल्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

पुणे शहर पोलीस, पुणे ग्रामीण पोलीस यांच्यातील काही भाग कमी करुन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाची स्थापना झाली. आयुक्तालय झाल्यानंतर सर्व प्रथम पोलीस आयुक्त आर.के. पध्दमनाभन यांनी कर्मचाऱ्यांना मागेल तिथे बदली दिली. यामुळे अनेकांनी आपल्याला सोयीस्कर अश्या बदल्या करुन घेतल्या. यानंतर कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या नाहीत. दुसरे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी बदल्या केल्या नाहीत.

याच महिन्यात 5 सप्टेंबर रोजी पोलीस आयुक्त म्हणून कृष्ण प्रकाश यांनी पदभार स्विकारला. पदभार स्वीकारल्यानंतर एक महिन्याच्या आतच मोठा धमाका केला आहे. आयुक्तालय स्थापन झाल्यापासून किंवा त्याच्याही अगोदर पासून एकाच ठिकाणी ठाम धरुन बसलेले, वेगवेगळ्या ठिकाणी असलेले आणि तपासी पथकाच्या कर्मचाऱ्यांना हलवले आहे.

पोलीस शिपाई ते सहाय्यक फौजदार बदल्यांचे गॅझेट सोमवारी पोलीस आयुक्तांनी केले आहे. यामध्ये 13 सहाय्यक फौजदार, पोलीस हवालदार 122, पोलीस नाईक 157, पोलीस शिपाई 107 एवढ्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमानावर बदल्या केल्याने पोलीस खात्यात एकच खळबळ उडाली आहे.