Pimpri News : मागील वर्षात वाहतूक पोलिसांवर सर्वाधिक हल्ले

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहाण्या माणसाने पोलीस ठाण्याची पायरी चढू नये असे म्हटले जाते. मात्र, शासकीय कामासाठी किंवा इतर कामासाठी पोलीस ठाण्यात जाण्याची वेळ येतेच. पोलीस ठाण्यातून किंवा इतर शासकीय कार्यालयातून वेळेवर काम होत नसल्याने नागरिक वैतागतात. त्यांचा राग अनावर होते आणि अधिकारी, कर्मचारी यांच्यावर हल्ले होतात. पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये मागील वर्षी अशा प्रकारच्या 50 घटना घडल्या आहे. यामध्ये पोलिसांवर हल्ले होण्याचे प्रमाण लक्षणीय आहे.

पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये तब्बल 41 पोलिसांवर हल्ले झाले असून यामध्ये वाहतूक पोलिसांवर हल्ले होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. कोरोना काळात पोलिसांनी आपले घरदार सोडून नागरिकांच्या हितासाठी अहोरात्र कष्ट घेतले. त्यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला. असे असताना नागरिकांनी नियमांचे उल्लंघन करत पोलिसांसोबत हुज्जत घालण्याच्या घटना घडल्या आहेत. तर काही नागरिकांनी थेट पोलिसांना मारहाण केल्याचे प्रकार समोर आले आहेत.

नागरिकांकडून वाहतूक पोलीस टार्गेट

पिंपरी चिंचवडमधून जुना पुणे-मुंबई महामार्ग, द्रुतगती महामार्ग, मुंबई-बंगळुरु, पुणे-नाशिक, तळेगाव-चाकण, चाकण-शिक्रापूर हे राज्यमार्ग जातात. महामार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. या मार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक पोलीस कर्तव्य बजावत असतात. मात्र, काही बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करत असताना पोलिसांसोबत वाहन चालक हुज्जत घालतात. काहीवेळा वाहन चालक वाहतूक पोलिसांना मारहाण करतात. 2020 मध्ये वाहतूक पोलिसांवर हल्ले करुन मारहाण केल्याच्या सर्वाधिक घडल्या आहेत.