पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील महिला पोलिसांनी पाहिला ‘मर्दानी 2’ चित्रपट

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – देशात घडत असलेल्या महिला अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड पोलीस दलातील सुमारे ३०० हुन अधिक महिला पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचे मनोबल वाढावे आणि नराधमांवर योग्य कारवाई व्हावी यासाठी अशाच घटनेवर आधारित असणारा ‘मर्दानी २’ चित्रपट सर्वांना एकत्र दाखविण्यात आला. “प्रत्येक पोलिसाने मर्दानीचं रुप धारण करून अत्याचारांची उकल केली पाहिजे”, अशी प्रतिक्रिया महिला पोलीस कर्मचाऱ्याने दिली. आकुर्डी येथील आयनॉक्स चित्रपटगृहात उद्या गुरुवारी दुपारी दोन वाजता या चित्रपटाचे आयोजन केले होते.

यावेळी तब्बल ३०० हून अधिक पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी हा चित्रपट पाहण्यासाठी हजेरी लावली होती. एरव्ही २४ तास कर्तव्यावर असलेल्या महिला पोलिसांनी चित्रपट पाहून समाधान व्यक्त केलं. पोलिसांचं जीवन हे अत्यंत तणावपूर्ण असून अशा चित्रपटातून विरंगुळा होत असेल तर भविष्यात देखील चित्रपट दाखवायला हवेत अशा भावना महिला पोलिसांनी व्यक्त केल्या आहेत.

राणी मुखर्जी या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट चांगली कामगिरी करत आहे. राणीने एका निडर आणि प्रामाणिक पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे.