ज्येष्ठ नागरिकाचे 40 तोळ्यांचे दागिने चिंचवड पोलिसांनी केले परत

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – ज्येष्ठ नागरिकाचा विश्वासघात करून लाखो रुपये लाटले. या प्रकरणात चिंचवड पोलिसांनी तपास करत ज्येष्ठ नागरिकाला 15 लाख 45 हजार रुपये किमतीचे सोने परत केले आहे. कृष्णलाल जगन्नाथ बुद्धिराजा (82, रा. निगडी, प्राधिकरण) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णलाल यांनी त्यांची जागा बांधकाम व्यावसायिक गोयल यांना विकसनासाठी दिली आहे.

या व्यवहाराचे धनादेश बाउन्स संदर्भात न्यायालयाचे व्यवहार व इतर व्यवहारासाठी प्रवीणकुमार मणिलाल जैन यांना पॉवर ऑफ ऍटर्नी केले आहे. त्यानंतर कृष्णलाल यांनी दिलेल्या धनादेशाचे जैन यांनी गैरवापर केला. कृष्णलाल यांच्या आयडीबीआय बँकेच्या खात्यावरून एचडीएफसी बँकेच्या खात्यावर 18 लाख रुपये पाठवले. त्या पैशातून त्यांनी रांका ज्वेलर्स येथून अर्धा किलो सोने खरेदी करून कृष्णलाल यांची फसवणूक केली.

याबाबत कृष्णलाल यांनी गुन्हा दाखल केल्यानंतर चिंचवड पोलिस ठाण्यातील पोलीस दत्ता गायकवाड यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे प्रकरणाचा छडा लावला. आरोपी जैन याने त्याने खरेदी केलेल्या सोन्याची डिलिव्हरी घेण्यासाठी मकनाभाई प्रजापती याला पाठवले होते. पोलिसांनी प्रजापती याचा माग काढून जैन याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे असून चौकशी केली असता त्याने हा गुन्हा केल्याचे कबूल केले. त्याच्याकडून 400 ग्रॅम वजनाचे 15 लाख 45 हजार रुपयांचे सोने हस्तगत करण्यात आले आहे.
हि कामगिरी उपायुक्त स्मिता पाटील, सहाय्यक आयुक्त राम जाधव, वरिष्ठ निरीक्षक भिमराव शिंगाडे, विश्वजीत खुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी केली.