पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे संकेतस्थळ ‘रेडी’

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या संकेतस्थळाचे (वेबसाईट) काम पूर्ण झाले आहे. इतर पोलीस आयुक्तालयाच्या तुलनेत आमच्या आयुक्तल्याचे संकेतस्थळ सर्वाधिक चांगले असेल असे मत पोलिस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी व्यक्त केले. पुढील आठवड्यात या संकेतस्थळाचे उद्घाटन होणार आहे. शासनाच्या निर्णयानुसार प्रत्येक शासकिय अस्थापनेला संकेतस्थळ सुरू करणे बंधनकारक आहे.

तत्कालिन पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी काही महिन्यांपूर्वी संकेतस्थळाच्या कामाला सुरूवात केली होती. त्यानंतर सध्याचे पोलिस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी संकेतस्थळ तयार करण्याचे काम वेगाने पूर्ण करण्यास भर दिला. त्याचबरोबर पोलिस आयुक्तालयाचे संकेतस्थळ पोलिस आणि नागरिक या दोघांनाही फायदेशीर ठरावे, या दृष्टीने ते तयार करण्याला महत्व दिले. त्यानुसार संकेतस्थळ तयार करण्याचे काम पूर्ण झाले असून येत्या आठवड्यात त्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या संकेतस्थळ हे सोप्या पद्धतीने हताळता यावे, अशा पद्धतीने तयार करण्यात आले आहे. पोलिस आयुक्तालय तसेच त्या अंतर्गत येणाऱ्या सर्व पोलिस ठाण्यांची माहिती, पोलिसांच्या सर्व युनिटची माहिती, वाहतूक पोलिस, गुन्हे शाखेची माहिती संकेतस्थळावर असणार आहे. पोलिस कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांची माहिती या संकेतस्थाळ पहायला मिळणार आहे. पोलिस भरती, पोलिस भरतीची परिक्षा, त्याचे निकाल हे सर्व संकेतस्थळावर टाकण्यात येणार आहे.

नागरिकांसाठी संकेतस्थळावर ‘ई – कंप्लेंट’ची सुविधा उपलब्ध करणार आहे. तसेच ‘ई – कंप्लेंट’ ‘सीसीटीएनएस’ला लींक असणार आहे. या सुविधाबरोबर सायबर क्राईम, ऑनलाईन आर्थिक फसवणूकीबाबत तसेच वाहतुकीचे नियम, अपघात याबाबत जनजागृती संकेतस्थळाद्वारे करण्यात येणार आहे. हे संकेतस्थळ सर्वात उत्तम असेल आणि याचा नागरिकांना चांगला फायदा होईल असा विश्वास पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी व्यक्त केला.

Visit : Policenama.com