‘कोरोना’बाधित रुग्ण आयसोलेशन इमारतीत ठेवण्यास विरोध करणारे ‘ते’ दोन नगरसेवक ताब्यात

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन –  शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, त्यामुळे अश्या लोकांना कुठे ठेवायचा हा प्रश्न प्रशासनापूढे आहे. यातच आकुर्डी येथे आयसोलेशनसाठी ताब्यात घेतलेल्या इमारतीत कोरोना बाधित परिसरातील नागरिकांना ठेवण्यासाठी विरोध केला जात होता. यामुळे पोलिसांनी शिवसेनेचे नगरसेवक अमित गावडे आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक राजू मिसाळ यांच्यासह अन्य दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

चिंचवड येथील आनंदनगर झोपडपट्टीत कोरोनाचा कहर सुरु आहे. झोपडपट्टीतील कोरोना आटोक्यात आणण्याचे प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे. त्यामुळे प्रशासनाने आनंदनगरमधील नागरिकांना निगडीतील पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या पिंपरी-चिंचवड अभियांत्रिकी (पीसीसीओई) महाविद्यालयात क्वारंटाईन करण्यास सुरुवात केली आहे.

शुक्रवारी (दि. 22) 14 नागरिकांना तिथे क्वारंटाईन केले आहे. 500 नागरिकांना तिथे क्वारंटाईन करण्याचे नियोजन आहे. परंतु, आनंदनगरमधील नागरिकांना त्या परिसरातच क्वारंटाईन करावे. निगडी प्राधिकरण आणि आकुर्डीचा काही भाग असलेल्या परिसरात कोरोनाचा शिरकाव झाला नाही. त्यामुळे हा परिसर ग्रीन झोन आहे.

आमच्या ग्रीनझोनमध्ये तेथील नागरिकांना क्वारंटाईन करु नये. प्रभागातील नागरिकांना त्याचा धोक निर्माण होईल, अशी भिती व्यक्त करत स्थानिक नगरसेवकांनी त्याला विरोध केला. मागील तीन-चार दिवसांपासून प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून हा विरोध सुरू होता. त्यामुळे पोलिसांनी दोन्ही नगरसेवकांना आज (दि.26) ताब्यात घेतले आहे. नगरसेवक शरद दत्ताराम मिसाळ उर्फ राजू मिसाळ, नगरसेवक अमित राजेंद्र गावडे यांच्यासह योगेश बाळकृष्ण जाधव, निलेश अनिल जांभळे यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांकडून फौजदारी दंड संहिता 1973 चे कलम 149 अन्वये नगरसेवकांना नोटीस देण्यात आली आहे.