Coronavirus : दिलासादयक ! पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसभरात तब्बल 2107 रुग्ण ‘कोरोना’मुक्त

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. शहरामध्ये मागील काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मात्र आज दिलासादयक आकडेवारी समोर आली आहे. आज दिवसभरात पिंपरी चिंचवड शहरात विक्रमी 2107 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. शहरामध्ये आज दिवसभरात 903 रुग्णांची कोरोनाची चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. आज दिवसभरात 18 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून मृतांची संख्या 439 वर पोहचली आहे.

पिंपरी चिंचवड मनपा आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज शहरामध्ये 903 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 22 हजार 063 एवढी झाली आहे. आज आढळून आलेल्या 903 रुग्णांमध्ये 870 रुग्ण शहरातील तर 33 रुग्ण शहराबाहेरील आहे. यांच्यासह 303 रुग्णांवर शहरातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच शहरातील 37 रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याच दरम्यान 18 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये 14 रुग्ण शहरातील आहेत तर 4 रुग्ण शहराबाहेरील आहेत. शहरातील मृतांचा आकडा 439 वर पोहचला आहे. यामध्ये 349 रुग्ण शहरातील तर 90 रुग्ण शहराबाहेरील आहेत.

शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. आज दिवसभरात विक्रमी 2107 रुग्णांची कोरोनाची दुसरी चाचणी निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत 14 हजार 682 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या शहरामध्ये 3553 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. आज शहरामध्ये काळेवाडी, पिंपरी, निगडी, मोशी, मिलिंदनगर, पिंपळे गुरव, चिंचवड, चिखली, वाल्हेकरवाडी, रहाटणी, खेड, विशालगड पुणे येथील रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.