पिंपरी चिंचवडकरांसाठी आनंदाची बातमी ! रेड झोनमधून वगळलं, आजपासून अंमलबजावणी, बाजार पेठा सुरु

पिपंरी : पोलीसनामा ऑनलाइन  – पिंपरी चिंचवड शहराला राज्य शासनाने रेड झोनमधून वगळले असून त्याची अंमलबजावणी शुक्रवारपासून सुरु झाली आहे. त्यामुळे आजपासून बाजारपेठ खुल्या होणार आहे. येत्या ४ दिवसात पीएमपी बससेवाही सुरु करण्यात येणार असल्याचे पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले. २६ मेपासून पिंपरी चिंचवड परिसरात ५० टक्के क्षमतेने पीएमपी बस सुरु करता येणार आहे.

मात्र, कटेन्मेंट झोनमधील बंदी कायम असणार आहे. मॉल, चित्रपटगृहे सुरु होणार नाहीत.
रुग्णवाढीचा आलेख कमी झाल्याने राज्य सरकारने अनेक शहरे रेड झोनमधून वगळली आहेत. त्यात पिंपरी चिंचवडचा समावेश करण्यात आला आहे. मात्र पिंपरी चिंचवड शहरातील रुग्ण वाढीचा आलेख गेल्या तीन दिवसांपासून वाढत होता. त्यामुळे महापालिकेने शासनाकडे मार्गदर्शन मागितले होते. शासनाच्या निर्णयानंतर महापालिका आयुक्तांनी पिंपरी चिंचवडमधील बंधने खुली करण्याचा निर्णय घेतला.

या गोष्टीना असणार बंदी

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये मेट्रो,  रेल प्रवास, शाळा-कॉलेज शैक्षणिक संस्था, हॉटेल रेस्टॉरंट, सिनेमा हॉल,  शॉपिंग सेंटर व्यायामशाळा, तरण तलाव , सभाग्रह नाट्यगृह,  सामाजिक धार्मिक,  राजकीय, क्रीडा मनोरंजन, सभा संमेलनं यास बंदी राहणार आहे. त्याचबरोबर सर्व धार्मिक स्थळे धार्मिक कार्यक्रम सभा-संमेलने होणार नाहीत.

त्याचवेळी शहर परिसरामधील अत्यावश्यक व वैद्यकीय सेवा व्यतिरिक्त सायंकाळी ७ ते सकाळी ७ दरम्यान संचारबंदी कायम राहणार आहे. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता अन्य गोष्टी बंद राहणार आहेत.

हे सुरु राहणार
माल वाहतुकीच्या ट्रकना वाहतूकीसाठी परवानगी राहणार आहे. तसेच क्रीडा संकुले, स्टेडियम खुली करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी एकट्याने खेळायचे खेळ, योगासने यांना परवानगी असेल.
मात्र, क्रिकेट, फुटबॉल, बॅडमिंटन,कबड्डी, खो खो या खेळांना परवानगी असणार नाही.
दुचाकीवर एकाच व्यक्तीला प्रवास करता येईल. तीनचाकीमध्ये चालकासह दोन व्यक्ती, चार चाकीमध्ये चालक आणि २ प्रवाशांचा परवानगी असणार आहे.

बाजारपेठेतील सर्व दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत खुली राहतील. मात्र, सामाजिक अंतर राखण्याच्या निकषांचे उल्लंघन झाल्यास दुकाने तात्काळ बंद करण्यात येतील. सर्व औद्योगिक कंपन्यांमध्ये कामावर उपस्थित राहण्यासाठी रेड झोन क्षेत्रातून येण्यासाठी महापालिकेकडून पूर्व परवानगी घेणे बंधनकारक असेल.

चिंचवड स्टेशन , पिंपरी कॅम्प,  गांधी पेठ चिंचवड,  काळेवाडी मेन रोड,  अजमेरा पिंपरी , निगडी बस स्टॉप जकात नाका परिसर , या भागातील दुकाने सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वेळात समविषम तारखेस खुली राहतील. या आदेशाची अंमलबजावणी शुक्रवारपासून करण्यात येणार आहे, असे महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.