पोलीस आयुक्त म्हणून कृष्ण प्रकाश यांच्या नियुक्तीमुळे पिंपरीतील अनेकांचे धाबे दणाणले

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त बदलणार याची रंगलेली चर्चा अखेर बुधवारी थांबली. ‘गुन्हेगारांचा कर्दनकाळ आणि चुकीच्या कामाला थारा नाही’ अशी ओळख असणारे कृष्ण प्रकाश यांची पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाल्याने शहरातील अनेक अधिकाऱ्यांची चलबिचल वाढली आहे.

पुणे शहर आणि पुणे ग्रामीण पोलीस दलातील भाग कमी करुन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाची निर्मिती झाली. त्यानंतर पहिले पोलीस आयुक्त म्हणून आर.के. पद्यमनाभन यांची नियुक्ती झाली. अपुऱ्या साधनांमध्ये त्यांनी आयुक्तालयाची घडी बसवण्यासाठी चांगले प्रयत्न केले. हे सुरु असतानाच निवडणुकामध्ये त्यांची बदली झाली आणि संदीप संदीप बिष्णोई यांची वर्णी लागली. यांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच त्यांची बुधवारी बदली झाली.

पिंपरी चिंचवडचे नवीन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची ओळख आयर्नमॅन म्हणून असून ते झारखंड मधील हजारीबाग येथील आहेत. 1998 च्या आयपीएस बॅचचे असणारे कृष्ण प्रकाश यांच्या नावावर सायकलिंग, स्विमिंग, रनिंग यासारखी अनेक रेकॉर्ड आहेत.

‘रेस्ट ॲक्रॉस वेस्ट अमेरिका’ या स्पर्धेत त्यांनी सहभाग घेतला. 1 हजार 500 किलोमीटर अंतर सायकलिंगची स्पर्धा असून हिचा मार्ग पश्चिम अमेरिकेच्या चार राज्यातून जाणारा असतो. या मार्गावर काही ठिकाणी अति उष्ण तर काही ठिकाणी अतिशय थंड प्रदेश लागतो. या स्पर्धेसाठी 92 तासांचा वेळ असतो. कृष्ण प्रकाश यांनी ही स्पर्धा 88 तासात पूर्ण करून स्पर्धेत यश मिळवले. तसेच सायकलिंगमध्येही नवीन रेकॉर्ड बनवला.

ऑगस्ट 2017 मध्ये फ्रांस मध्ये ‘आयर्नमॅन ट्रायलथॉन’ ही स्पर्धा झाली. 3.86 किलोमीटर पोहणे, 42 किलोमीटर धावणे आणि 180 किलोमीटर सायकल चालवणे असे या स्पर्धेचे स्वरूप असते. कृष्ण प्रकाश यांनी ही स्पर्धा देखील 14 तास 8 मिनिटात पूर्ण करून वयाच्या 42 व्या वर्षी आयर्नमॅनचा किताब मिळवला आहे.

नेहमी हसतमुख असणारे कृष्ण प्रकाश हे कामातही खिळाडू वृत्तीचे असल्याचे बोलले जाते. गुन्हेगारांना सळो की पळो करुन सोडणारे अशी त्यांची ओळख आहे. नावा प्रमाणेच काम करणारे म्हणजेच चुकीच्या कामांना थारा दिला जात नाही असे त्यांच्याबाबत बोलले जाते. त्यांनी राज्यात यापूर्वी ज्या ठिकाणी काम केले आहे तिथे त्यांचे चांगले नाव आहे. पोलीसी खाक्या दाखवून गुन्हेगारांचा कर्दनकाळ अशी त्यांची ओळख आहे.

पिंपरी चिंचवड पोलीस दलातील अवस्था काहीशी बिघडत चालली होती. कृष्ण प्रकाश यांच्या नियुक्तीमुळे ती सुधारेल असे काही पोलीस अधिकारी आणि नागरिकांचे मत आहे. कृष्ण प्रकाश यांच्या मागील कामाची पध्द्त पाहता शहरातील पोलीस पोलिसिंग करतील आणि गुन्हेगारांवर जरब बसेल असेच वाटते. आता कृष्ण प्रकाश पिंपरी चिंचवडमध्ये कश्या प्रकारे आपल्या कामाचा ठसा उमटवतात ते पाहणे योग्य होईल.

कृष्ण प्रकाश यांची वर्णी लागणार याची चर्चा अनेक दिवसांपासून पोलीस दलात होती. मात्र ते विशेष पोलीस महानिरीक्षक असल्याने ते बसू शकणार नाहीत, असा ग्रह अनेकांचा होता. ‘जाईल तिथे खाईल’ या म्हणी प्रमाणे काही पोलीस अधिकाऱ्याचे काम सुरु होते. शहर पोलिसांवर नागरिकांकडून वेगवेगळे आरोप होत गेले, मात्र याकडे कोणत्याच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नाही. शहरातील राजकीय लोकांनी तर थेट वरिष्ठ अधिकारी ते कर्मचारी यांच्यावरच आरोप केले. पिंपरी चिंचवड पोलिसांचे कामकाज सुधारा आणि सर्वसामान्य जनतेला न्याय द्यावा यासाठी मुख्यमंत्री, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री यांना पत्रव्यवहार करण्यात आलेला होता.

कृष्ण प्रकाश यांची नियुक्ती झाल्यामुळे अश्या पोलीस अधिकाऱ्यांची चलबिचल सुरु झाली आहे. नागरिकांकडून नवीन पोलीस आयुक्तांकडून मोठ्या अपेक्षा वाढल्या आहेत. शहरातील गुन्हेगारीची पाळेमुळे उखरुन काढण्यात आली बिघडलेली पोलीस यंत्रणा रुळावर आणण्यात ते यशस्वी होतात का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.