गुन्हे शाखा युनिट एकची ‘हॅट्रिक’; उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सन्मान

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पाच पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सन्मान पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी केला. या पाच टीममध्ये सलग तीन क्राइम मीटिंगमध्ये वेळा सन्मान घेऊन गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने ‘हॅट्रिक’ केली आहे. तर शिरगाव चौकी, पिंपरी पोलीस स्टेशन, देहूरोड पोलीस स्टेशन यांच्या प्रत्येकी एका कामगिरी बद्द्ल सन्मान करण्यात आला आहे.

भोसरी परिसरात पुणे-नाशिक रोडने जात असताना एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावून नेले होते. या गुन्ह्यातील आरोपीला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी शिताफीने पकडले. त्याच्याकडे चौकशी केली असता आरोपीने वरील गुन्ह्यासह पिंपरी-चिंचवड शहरात 10 ठिकाणी सोने चोरल्याची कबुली दिली होती. युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, अमित गायकवाड, गणेश सावंत, विजय मोरे, प्रवीण पाटील, मनोजकुमार कमले या पथकाचा आयुक्तांनी सन्मान केला. देहूरोड बौद्धविहाराच्या 65 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात एक रिक्षा चालक धर्माधर्मात तेढ निर्माण करणारे पत्रक वाटत होता.

याबाबत पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आक्षेपार्ह पत्रके वाटणा-या रिक्षा चालकाला ताब्यात घेतले. यामुळे दंगल किंवा अन्य प्रकारचा अनर्थ टळला. याबाबत युनिट एकचे पोलीस नाईक महेंद्र तातळे आणि अंजनराव सोडगीर यांचा पोलीस आयुक्तांनी सन्मान केला. गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने आता प्रयत्न झालेल्या तीन क्राइम मिटींग मध्ये सन्मान मिळवला आहे.

सोमाटणे फाट्याजवळ चार जणांनी मिळून पूर्ववैमनस्यातून एका तरुणावर कोयत्याने वार करून खुनी हल्ला केला. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला. या गुन्ह्याचा तपास करत असताना लोहगड किल्ल्याच्या पायथ्याला असलेल्या दुधिवरे खिंडीतील जंगलात लपून बसलेल्या चार जणांना शिरगाव पोलिसांनी घटनदात जंगलातून अटक केली. याबाबत शिरगाव पोलीस चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर म्हसवडे, पोलीस कर्मचारी आर एस पालांडे, डी डी काठे, वाय जे नागरगोजे, जे एस कोठावळे या पथकाचा पोलीस आयुक्तांनी सन्मान केला.

एकाने एका महिला आणि तिच्या दोन मुलांसोबत संगनमत करून महिलेच्या पतीचा खून केला आणि अपघाताचा बनाव रचला. पोलिसांनी सुरुवातीला या प्रकरणात अपघाताची नोंद केली. मात्र, तपास करत असताना गुन्हे शाखा युनिट पाचच्या पोलिसांनी या प्रकरणाचा तांत्रिक मुद्द्यांच्या आधारे तपास केला. यामध्ये खून झालेल्या व्यक्तीच्या पत्नी आणि मुलांचा संशय आल्याने त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी खुनाची कबुली दिली. या कामगिरीबाबत युनिट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे, पोलीस कर्मचारी धनराज किरनाळे, दत्तात्रय बनसुडे, फारूक मुल्ला, मयूर वाडकर, आशाबाई जाधव या पथकाचा पोलीस आयुक्तांनी सन्मान केला.

थरमॅक्स चौकाजवळ एका हॉटेलच्या पार्किंगमध्ये चार जणांनी मिळून एका कार चालकाला मारहाण करून लुटले. याबाबतची माहिती नियंत्रण कक्षातून पिंपरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस नाईक डी के तोडकर आणि एस बी माकरे यांनी आरोपींचा पाठलाग करून दोघांना पकडले. त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केले. गुन्हा घडल्यानंतर काही क्षणात पोलिसांनी तत्परता दाखवून ही कामगिरी केल्याबद्दल पोलीस कर्मचारी तोडकर आणि माकरे यांचा पोलीस आयुक्तांनी सन्मान केला.