टँकरचे बील सोसायट्यांच्या माथी मारण्याऐवजी महापालिकेने भरावे : सचिन साठे

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यामध्ये नुकत्याच स्थापन झालेल्या महाविकास आघाडीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील नागरिकांचा जिव्हाळ्याचा पाणीप्रश्न सोडवावा. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर भाजपाची एकहाती सत्ता आहे. टँकर लॉबीला पोसण्यासाठी आयुक्तांनी नागरिकांवर दिवसाआड पाणी कपात लादली आहे. ‘धरण उशाला, कोरड घशाला’ अशी शहरातील करदात्या नागरिकांची अवस्था झाली आहे. सत्ताधाऱ्यांचे आयुक्तांवर नियंत्रण नाही आणि आयुक्तांचा प्रशासनावर अंकुश नाही. नागरिकांच्या मूलभूत अधिकारावर अतिक्रमण करणाऱ्या आणि निष्क्रीय प्रशासनाला पाठीशी घालणाऱ्या आयुक्त श्रावण हर्डीकर यांची ताबडतोब बदली करावी व या विषयाशी संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी केली.

पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने आज पाणी कपातीच्या विरोधात महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. यावेळी सचिन साठे बोलत होते. यावेळी साठे यांनी केलेल्या मागणीनुसार पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रामदास तांबे यांनी मोर्चाचे निवेदन स्वीकारले. सचिन साठे म्हणाले की, पाणीगळती व पाणीचोरी रोखण्यास मनपा प्रशासनाला पूर्णत: अपयश आले आहे. शहरातील नागरिक वेळोवेळी पाणीपट्टीसह सर्व कर महापालिकेच्या तिजोरीत भरतात. मिळकत कर व पाणीपट्टी कर थकवणाऱ्या नागरिकांवर जप्तीच्या नोटीसा बजावला जातात. सेवा न देता दडपशाही करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. नागरिकांना पाणी देण्याऐवजी टँकर लॉबी पोसण्याचा उद्योग प्रशासन करीत आहे. ज्या सोसायट्यांना खासगी टँकरव्दारे पाणी घ्यावे लागते. त्यांना महापालिकेने टँकरव्दारे पाणी पुरवठा करावा. या टँकरचे बील सोसायट्यांच्या माथी मारण्याऐवजी महापालिकेने भरावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

धरणात मागील वर्षीपेक्षा जास्त जलसाठा आजही आहे. चालू वर्षी जास्त झालेल्या पावसामुळे धरणक्षमतेच्या चौपट पाणी नदीव्दारे विसर्ग करून सोडण्यात आले. पुढील वर्षी सप्टेंबर अखेरपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा आहे. असे असतानाही दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे आयुक्तांचे नियोजन म्हणजे त्यांच्या अपयशाची व अकार्यक्षमतेची कबुलीच आहे. मागील सार्वत्रिक निवडणुकीत शहरभर चोवीस तास पुरेशा दाबाने आणि शहराला बंद जलवाहिनीव्दारे पाणीपुरवठा करू असे आश्वासन भाजपाने आपल्या जाहिरनाम्यात दिले होते. त्याचा विसर आता पदाधिकाऱ्यांना पडला आहे, अशीही टीका साठे यांनी यावेळी केली.

Visit : policenama.com