काळेवाडीत घरासमोरील तीन दुचाकी जाळल्या

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – एक वर्षापूर्वी भाडेकरू असलेल्या तरुणाने त्याच्या मित्राच्या मदतीने घर मालकावर हल्ला केला. घरा समोरील तीन दुचाकी पेट्रोल टाकून जाळल्या. यावेळी प्रतिकार करणाऱ्यास कोयत्याचा धाक दाखवून, जीवे मारण्याची धमकी देत त्याच्या खिशातील दोन हजार रूपये काढून परिसरात दहशत माजवली. हा प्रकार मंगळवारी दुपारी बारा वाजता घडला.

या प्रकरणी बाबासाहेब प्रभाकर पानढवळे (49, रा. मोरया कॉलनी, विजयनगर, काळेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. तर विजय सिद्धार्थ म्हस्के (19, रा. कोकणेनगर, काळेवाडी) याला अटक केली असून निरंजन महारा, शुभम कसबे, संकेत चौधरी, व त्यांचा एक साथीदार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पानढवळे यांच्या घरात विजय हा भाडेकरू म्हणून राहत होता. एक वर्षापूर्वी त्याला पानढवळे यांनी घरातून काढून टाकले. याचा राग मनात धरुन विजय याने त्याच्या मित्राच्या मदतीने पानढवळे यांच्या घरावर हल्ला चढविला. घरा समोरील तीन दुचाकी जाळल्या. यावेळी प्रतिकार करणाऱ्या पानढवळे यांच्या मानेवर कोयता ठेवून जीवे ठार मारण्याची धमकी देत खिशातील दोन हजार चोरुन नेले. तसेच इतरानाही धमकी देत परिसरात दहशत माजवली.