विनयभंग प्रकरणी भाजपा महिला पदाधिकाऱ्याच्या पती विरुद्ध FIR

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – मासुळकर कॉलनी, पिंपरी येथे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात भाजप महिला पदाधिकाऱ्याच्या पतीने एका महिलेचा विनयभंग केला. याप्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.

याबाबत 27 वर्षीय महिलेने सोमवारी (दि. 9) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी महिला भाजप पदाधिकाऱ्यासह तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपच्या महिला पदाधिकारी या आपल्या घराजवळ सीसीटीव्ही कॅमेरा बसवत होत्या. त्यावेळी त्यांनी सीसीटीव्ही कॅमेराचे तोंड शेजारच्या घराकडे केले. त्या शेजाऱ्याने आक्षेप घेतला. या कारणावरून झालेल्या भांडणात भाजप महिला पदाधिकाऱ्याने फिर्यादी महिलेला हाताने मारहाण करीत ठिकठिकाणी ओरखडले. तर भाजप महिला पदाधिकाऱ्याच्या पतीने महिलेचा विनयभंग केला.

भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या फिर्यादी यांची आई, बहिण यांना त्या पदाधिकारी महिलेने काठीने मारहाण केली. फिर्यादी यांच्या वडिलांना पदाधिकाऱ्याच्या सासऱ्याने मारहाण केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर चव्हाण याबाबत अधिक तपास करीत आहेत.

तर या घटनेच्या परस्पर विरोधी फिर्यादी महिला भाजप पदाधिकाऱ्याने दिली आहे. पोलिसांनी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यातील आरोपींनी पाइपने मारहाण करीत फिर्यादी भाजप पदाधिकाऱ्या चारित्र्याबाबत अश्‍लिल शब्द वापरले. तसेच आरोपी हातोडी घेऊन माहरण करण्यास धावून आले. दोन दिवसात तुम्हाला कापून टाकतो, अशी धमकी दिली. पोलीस हवालदार खेडकर याबाबत अधिक तपास करीत आहेत.