अनेक दिवसांपासून थांबलेले एटीएम फोडण्याचे सत्र पुन्हा सुरु

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन –  पिंपरी चिंचवड शहरात पाठीमागे अनेक एटीएम सेंटर फोडण्याचे प्रकार सुरु होते. या सत्रास वाकड पोलिसांनी लगाम घातला. त्यामुळे काही दिवस हे सत्र थांबले होते. मात्र शनिवारी रात्री भोसरी एमआयडीसी मधील महात्मा फुले नगर ते लांडेवाडी रस्त्यावर असलेले ऍक्‍सीस बॅंकेचे एटीएम चोरट्यांनी फोडले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एसआयटी टीम आणि गुन्हे शाखेचे कर्मचारी संयुक्‍तरित्या शनिवारी रात्री गस्त घालत होते. ते भोसरी एमआयडीसीतील महात्मा फुले नगर ते लांडेवाडी रस्त्यावर आले असता त्यांना ऍक्‍सीस बॅंकेच्या एटीएममधील लाइट बंद असल्याचे दिसून आले. त्यांनी आत जाऊन पाहिले असता चोरट्यांनी एटीएममधील बॅटऱ्या चोरून नेल्या. तसेच एटीएम मशिन फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात त्यांना यश आलेले नाही.

चोरट्यांनी चोरी करण्यापूर्वी सीसीटिव्ही कॅमेरा छताच्या दिशेने फिरवून ठेवला. याबाबत गुन्हे शाखेच्या पोलिसांनी स्थानिक पोलिसांना कळविले.सध्या लॉकडाऊन असल्यामुळे एमआयडीसी परिसरातील कंपन्या बंद असल्याने दिवसाही या भागत शुकशुकाट असतो. चोरी करण्याच्या पद्धतीवरून आरोपी हे स्थानिक असावेत, अशी शक्‍यता पोलिसांनी व्यक्‍त केली. याबाबत बॅंकेच्या अधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहे. मात्र आज रविवार असल्याने अद्याप कोणीही पोलिसांशी संपर्क साधलेला नाही. तपास पोलीस करत आहेत.