पिंपरीतील आनंदनगर मध्ये दगडफेक, तोडफोड

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरात सर्वाधिक “करोना’चे रुग्ण आढळलेल्या आनंदनगर झोपडपट्टी परिसरातील रहिवासी आक्रमक झाले असून त्यांनी तुफान दगडफेक अणि तोडफोड केली आहे .

“संपूर्ण देशात लॉकडाऊन शिथिल झाले आहे. आमच्या परिसरात “करोना’चे जास्त रुग्ण सापडतात, हे एक राजकीय षडयंत्र आहे. त्यामुळे आम्हाला कामावर जाऊ द्या,’ अशी मागणी करीत प्रतिबंधित क्षेत्र असलेल्या चिंचवड स्टेशन येथील आनंदनगर परिसरातील हजारो नागरिक पुन्हा रस्त्यावर आले. त्यांनी घोषणाबाजी करीत पोलीस बूथ, खुर्च्या आणि पोलिसांच्या खासगी वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. ही घटना सोमवारी (दि. 8) दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडली.

चिंचवड स्टेशन येथील आनंदनगरमध्ये दोनशेहून अधिक करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे.

सोमवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास हजारो नागरिक घोषणा देत पुन्हा रस्त्यावर आले. स्थानिकांनी आरोप केले की, संपूर्ण देशात लॉकडाऊन शिथिल झाले असून सर्व व्यवहार सुरू झाले आहेत. राजकीय षडयंत्रातून आनंदनगर परिसरात करोनाचे रुग्ण सापडल्याचे सांगत येथील नागरिकांना घरात बसवून ठेवले आहे. आम्हालाही कामावर जाऊ द्या, अशी मागणी येथील नागरिकांनी केली. तसेच काही जणांनी हुल्लडबाजी करण्यास सुरुवात केली. पोलिसांच्या दिशेने दगडफेक केल्याने एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी नागरिकांना आपआपल्या घरात जाण्याचे आवाहन केले.

काहींनी पोलिसांच्या बुथमधील खुर्च्यांची तोडफोड केली. तर काही हुल्लडबाजांनी पोलिसांच्या खासगी वाहनांची तोडफोड करीत ती गटारात टाकली. त्यानंतर पोलिसांनीही आक्रमक भूमिका घेत जमावावर लाठीचार्ज केला. पोलीस नियंत्रण कक्षाला याबाबतची माहिती मिळताच राज्य राखीव पोलीस दलासह मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांची जादा कुमक येताच जमाव पळून गेला.