पिंपरी : तुरूंगातून पळालेला गुन्हेगार अटकेत

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – येरवडा कारागृहातील खिडकीचे गज कापून पलायन केलेल्या पैकी एका गुन्हेगाराला वाकड पोलिसांनी जेरबंद केले आहे. सनी टायरल पिंटो (२५, रा. पानसरे कॉलनी, पडवळनगर, थेरगांव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. वरिष्ठ निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सनी हा येरवडा तुरूंगात न्यायालयीन कोठडीत होता. त्यावेळी त्याने तेथील इतर चार कैद्यांच्या मदतीने येरवडा तुरूंगाच्या खिडकीचे गज तोडुन बुधवारी (दि. १५) रात्री पलायन केले. याप्रकरणी त्याच्या विरोधात येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तसेच याबाबत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना सतर्क करण्यात आले.

सनी पिंटो हा थेरगाव येथील असल्याने वाकड पोलीस त्याच्या मागावर होते. आरोपी सनी हा थेरगावच्या केजूदेवी बंधाऱ्या जवळ येणार असल्याची माहिती पोलीस कर्मचारी प्रशांत गिलबिले यांना बातमीदारामार्फत मिळाली. त्यानुसार त्याला पाठलाग करुन मोठया शिताफीने ताब्यात घेतले. त्यास पुढील कारवाईसाठी येरवडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदिप बिष्णोई, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त विनायक ढाकणे, सहायक आयुक्त श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, सहायक निरिक्षक हरिष माने पोलीस कर्मचारी प्रशांत गिलबिले, बाबाजान इनामदार, बापुसाहेब धुमाळ, जावेद पठाण, विक्रम जगदाळे, विजय गंभीरे, विक्रम कुदळ, सचिन नरुटे, प्रमोद कदम, नितीन गेंगजे, दिपक भोसले, शाम बाबा, तात्या शिंदे यांनी केली.