Pimpri : धाकट्या भावाच्या प्रेमासाठी खाल्ला बेदम मार ! पळून जाऊन लग्न केलेल्यांची माहिती न दिल्याने वधुच्या भावांनी वराच्या भावाला चोपले

पिंपरी : प्रेमासाठी वाट्टेल ते असे म्हटले जाते. दोघा प्रेमवीरांचे प्रेम सफल व्हावे, यासाठी अनेक जण प्रयत्न करत असताना छाकट्या भावाच्या प्रेमासाठी थोरल्याने चक्क वधुच्या भावाकडून बेदम मार खावा लागला. तरीही त्यांनी पळून जाऊन लग्न केलेल्या आपल्या भावाचा पत्ता काही त्यांना दिला नाही. खेड तालुक्यात हा प्रकार घडला.

चाकण पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नितीन भाऊका ढेंबरे, तेजस भास्कर ढेंबरे, नवनाथ भाऊका ढेंबरे आणि दाद्या सुभाष ढेंबरे (रा. बीरेवाडी, ता. संगमनेर, जि़ अहमदनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी प्रमोद रामभाऊ सागर (वय ३३, रा. आदर्शनगर, चाकण, ता. खेड) यांनी चाकण पोलिसांकडे दिली आहे. हा प्रकार खांलुब्रे येथील समर्थ अ‍ॅटो गॅरेजमध्ये ४ एप्रिल रोजी सकाळी साडेदहा वाजता घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रमोद सागर हा मॅकेनिक आहे. फिर्यादीचा भाऊ सचिन सागर व आरोपी दाद्या ढेंबरे याची बहिण दिशा ढेंबरे यांनी पळून जाऊन प्रेमविवाह केला आहे. त्यामुळे दिशा हिचे भाऊ चिडले आहेत. दोघांना शोधत सर्व जण खांलुब्रे येथील समर्थ अ‍ॅटो गॅरेजमध्ये आले होते. त्यांच्या लग्नाला प्रमोद उपस्थित होता. तसेच ते जामीनदारही राहिले होते. आरोपींनी प्रमोद यांना सागर व दिशा कोठे आहेत, याची चौकशी केली. पण त्याने त्यांच्याविषयी काहीही माहिती दिली नाही. त्यामुळे चिडून नवनाथ ढेंबरे याने हातातील झाडाच्या फांदीने प्रमोद याच्या पायाचे मांडीवर, हातावर मारहाण केली. इतरांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. औषधोपचार घेतल्यानंतर त्यानंतर त्यांनी चाकण पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.