विनाकारण सोसायटीच्या पार्किंगमध्ये थांबण्यावरुन वाद ! सोसायटी चेअरमनचे फोडले डोके,परस्परविरोधी गुन्हे दाखल

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – दोन तरुण विनाकारण सोसायटीच्या पार्किंगमध्ये थांबले होते. तिथेच सोसायटीमधील महिला पाणी भरत होत्या. त्यामुळे सोसायटीच्या चेअरमनने तरुणांना तिथून जाण्यास सांगितले. या कारणावरून दोन तरुण आणि त्यांच्या दहा साथीदारांनी मिळून चेअरमन आणि त्यांच्या मुलाला कोयता, रॉड आणि पालघनने बेदम मारहाण केली. यात चेअरमन आणि त्यांच्या मुलाचे डोके फुटल्याने दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी (दि.१०) रात्री अजंठानगर येथील अमृतकृपा हाऊसिंग सोसायटीमध्ये घडली. या प्रकरणात परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाबासाहेब गोविंद कांबळे (२२), स्वप्नील भिसे (२०), गोपाळ कांबळे (२३), महावीर कांबळे (२५), सुरेश श्रावण कांबळे (४५), शिवा येतनाळकर (२०), रामा कोळी ( २२), लता कांबळे (३५) अन्य अन्य चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी बाबासाहेब गोविंद कांबळे (५०, रा. अमृतकृपा हाऊसिंग सोसायटी, अजंठानगर) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दीपक आणि स्वप्नील हे सोसायटीच्या पार्किंगमध्ये विनाकारण बसले होते. फिर्यादी हे सोसायटीचे चेअरमन आहेत. त्यांनी आरोपींना सांगितले की, ‘महिला पाणी भरत आहेत, येथे थांबू नका’. असे सांगितल्याचा राग आल्याने आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी यांना शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपी दीपक याने आपल्या अन्य साथीदारांना बोलावून आणले. सर्व आरोपींनी फिर्यादी बाबासाहेब यांचा मुलगा आनंद आणि बाळा या तिघांना हाताने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. दीपक याने बाबासाहेब यांच्या डोक्यात कोयत्याने मारले. आरोपी स्वप्नील याने लोखंडी रॉडने बाबासाहेब यांच्या डोक्यात मारले. आरोपी महावीर याने पालघन, तर आरोपी सुरेश याने लोखंडी हातोड्याने बाबासाहेब यांच्या डोक्यात मारले. या भांडणात फिर्यादी बाबासाहेब आणि त्यांच्या मुलाचे डोके फुटले. भांडणात दोघेजण गंभीर जखमी झाले. त्यानंतर आरोपीने फिर्यादी बाबासाहेब यांची रिक्षा आणि तवेरा गाडीच्या काचा फोडून नुकसान केले.

याच्या परस्पर विरोधात दीपक सुरेश कांबळे (१९) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार बाबासाहेब गोविंद कांबळे, अविनाश बनसोडे, आनंद कांबळे, प्रतीक कांबळे, विजय ठोसर, अमोल साबळे, क्रिश गायकवाड, ईश्वर (पुर्ण नाव पत्ता माहीती नाही), बाबा कांबळे यांची भाची राधा सरोदे, पूजा साबळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबासाहेब आणि त्यांच्या नातेवाईकांनी फिर्यादी यांच्याशी सोसायटीच्या पार्किंगमध्ये बसण्याच्या कारणावरून वाद घातला.आरोपींनी आपसात संगणमत करून फिर्यादी, त्यांचा भाऊ महावीर, मावसभाऊ राजेंद्र विसापुरे, फिर्यादी यांची आई यांना कोयता, लोखंडी रॉड, लाकडी बांबूने तसेच चपलेने मारहाण करून जखमी केले. दोन्ही गुन्ह्यांचा तपास निगडी पोलीस करीत आहेत.