Pimpri : धक्कादायक ! वॉरंट देण्यासाठी गेलेल्या दिल्ली पोलिसांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून मारहाण

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – नवी दिल्ली येथे दाखल असलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यात पटियाला हाऊस कोर्टाने (Patiala House Court) चिखली येथील एका आरोपीवर नॉनबेलेबल वॉरंट (Warrant) बाजवले होते. कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल स्टाफमधील पोलिस उपनिरीक्षक आणि त्याचे सहकारी आरोपीच्या घरी गेले होते. त्यावेळी आरोपीच्या नातेवाईकांनी दिल्ली पोलिसांच्या डोळ्यात (Eye) मिरची पूड (Chilli Powder) टाकून त्यांना मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि.16) पावणे तीनच्या सुमारास रमदासनगर चिखली येथे घडली.

याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे. संदीप रामदास साबळे याला अटक करण्यात आली आहे. तर कमल रामदास साबळे, सुनिता संदीप साबळे, सारिका दिपक साबळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दिल्ली स्पेशल स्टाफचे पोलीस उपनिरीक्षक नरेंद्रमकुमार नंदलाल सहरावत (वय-39 रा. मुनिरका, न्यु दिल्ली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2019 मध्ये नवी दिल्ली येथील पार्लमेन्ट स्ट्रीट पोलीस ठाण्यात दिपक साबळे याच्या विरोधात फसवणकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला पटियाला हाऊस कोर्टाने नॉनबेलेबल वॉरंट बजावले आहे. या गुन्ह्यातील आरोपी पिंपरी चिंचवडमधील चिखली परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार दिल्ली पोलिस दलातील स्पेशल स्टाफमध्ये कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक नरेंद्रकुमार सहरावत आणि त्यांचे सहकारी संजीव हे बुधवारी दुपारी पावणे तीनच्या सुमारास वॉरंटची बजावणी करण्यासाठी आरोपी दिपक साबळे याच्या घरी गेले. त्यावेळी दिपक साबळेच्या नातेवाईकांनी संगनमत करुन फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपी दिपकचा ठावठिकाणा सांगितला नाही. तसेच लोखंडी गेट जोरात ओढून घेतले.

यामध्ये फिर्यादी सहरावत यांच्या उजव्या हाताची बोटे लोखंडी गेटमध्ये अडकून दुखापत झाली. त्यानंतर आरोपी संदीप, कमल, सरिता, सुनीता यांनी फिर्यादी यांची बोटे पिरगाळून त्यांना मारहाण केली. एवढेच नाही तर त्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून डोक्यात बुक्क्यांनी मारहाण करत सरकारी कामात अडथळा निर्माण केला. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करत आरोपी संदीप साबळे याला अटक केली आहे. पुढील तपास चिखली पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक देशमुख करत आहेत.