कंबरेपासून वरचा भाग नसलेला मृतदेह आढळल्यानं प्रचंड खळबळ

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – कमरेच्या वरचा भाग नसलेला, पोत्यात बांधलेला मृतदेह शिरगाव-कासारसाई रोडवर साळुंब्रे-दारुंब्रे गावाजवळील ओढ्यात आढळला आहे. हा धक्कादायक प्रकार मंगळवारी (दि. 18) रात्री साडेसातच्या सुमारास उघडकीस आला.

शिरगाव चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर म्हसवडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. 18) रात्री साडेसातच्या सुमारास साळुंब्रे-दारुंब्रे गावाजवळील ओढ्यात पांढ-या खताच्या पोत्यात एक पुरुष जातीचा 35 ते 40 वयाचा अर्धवट कमरेपासून पायाचा भाग सापडला. दोन्ही पाय कॉटनच्या हिरव्या रंगाच्या साडीने बांधलेले आहेत. खून करून शरीराचा अर्धा भाग वाहनातून आणून टाकल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

याप्रकरणी शिरगाव परंदवडी पोलीस चौकीत अज्ञातांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर व्यक्तीबाबत काही माहिती मिळाल्यास, कमरेपासून वरचा भाग आढळून आल्यास शिरगाव पोलीस चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर म्हसवडे (8208786499) यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.