Pimpri : माथाडी कामगारांच्या नावाने खंडणी मागणार्‍यांवर FIR दाखल

पिंपरी : माथाडी कामगार संघटनेच्या नावाने खंडणी मागणार्‍या व कंटेनर खाली करुन न देणार्‍या दोघांविरुद्ध हिंजवडी पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.

अमृत वळवे आणि रामनारायण पारखी (दोघे रा. माळ, ता. मुळशी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. ही घटना हिंजवडीतील डसॉल्ट कंपनीत गेल्या तीन महिन्यांपासून मंगळवारपर्यंत सुरु होती.

याप्रकरणी संतोष सावंत (वय ४४, रा. तळेगाव दाभाडे) यांनी हिंजवडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे व्यवसायिक आहेत. त्यांचे मटेरियल घेऊन दोन कंटेनर मंगळवारी दुपारी डसॉल्ट कंपनीत आले होते. तेव्हा अमृत वळवे याने फिर्यादींना फोन करुन सांगितले की, तुमच्या गाड्या खाली होण्यासाठी कंपनीत आलेल्या आहेत. मी आणि रामनारायण पारखी यांनी गाड्या थांबवलेल्या आहेत. तुम्हाला प्रत्येक गाडीमागे ६ हजार रुपये द्यावे लागतील, त्याशिवाय तुमच्या गाड्या खाली होऊ देणार नाही, अशी धमकी वळवे याने दिली. वळवे आणि पारखी यांचा कसलाही संबंध नसताना माथाडी संघटनेच्या नावाखाली आमच्याकडून जबरदस्तीने पैशांची मागणी करुन मारण्याची धमकी देऊन आमचे कंटेनर लोड अथवा अनलोड करुन देत नसल्याचे त्यांनी फिर्यादी म्हटले आहे.