बालेवाडी येथील सॉफ्टवेअर कंपनीत आग

पुणे (हिंजवडी) : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील हिंजवडी जवळील बालेवाडी येथे एका बहुमजली इमारतीच्या चौथ्या मजल्यावर आग लागली. या व्यावसायिक इमारतीमध्ये चौथ्या मजल्यावर असलेल्या सॉफ्टवेअर कंपनीत आज (रविवार) दुपारी तीनच्या सुमारास आग लागली. सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.

अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बालेवाडी चौकातील एका व्यावसायिक इमारतीतील चौथ्या मजल्यावर एक सॉफ्टवेअर कंपनी आहे. दुपारी तीनच्या सुमारास कंपनीच्या काही भागामध्ये आग लागली. रविवार असल्याने कंपनीत काम करणाऱ्यांना सुट्टी असल्याने आतमध्ये कोणीही अडकले नसल्याची प्राथमिक माहिती आहे. आग लागून मोठ्या प्रमाणात धूर झाला होता.

आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. तसेच खासगी टँकर देखील घटनास्थळी दाखल झाला. धूर मोठ्या प्रमाणात असल्याने अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडचणी आल्या. मात्र, जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. कंपनीत लगलेल्या आगीच्या धुराचे लोट इमारतीच्या पार्किंगपर्यंत पोहचले होते.