पिंपरी : 25 लाखांची फळझाडे तोडून केली विक्री

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात एक झाड जरी तोडायचे असेल तर त्यासाठी वृक्ष समितीची परवानगी घ्यावी लागते. मात्र, चिंचवडमधील वाल्हेकरवाडी येथील रानमळा हॉटेलजवळील २५ लाख रुपये किंमतीची झाडे, विनापरवाना तोडून त्याची चोरी करुन विक्री केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चिंचवड पोलिसांनी विजय विठ्ठल चिंचवडे व शरद विठ्ठल चिंचवडे (दोघेही रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी नितीन दत्तात्रय चिंचवडे (वय ५८, रा. आयडीएल कॉलनी, कोथरुड) यांनी चिंचवड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. फिर्यादी आणि आरोपी हे नातेवाईक आहेत. फिर्यादी यांची वाल्हेकरवाडी येथे जागा आहे. या जागेत आंबा, फणस, चिक्कू, बाभुळ व इतर छोटी मोठी झाडे होती. मार्च महिन्यात आरोपींनी त्यांच्या जागेत अतिक्रमण करुन त्यातील २५ लाख रुपये किंमतीची झाडे विनापरवाना तोडून त्यांची चोरी करुन विक्री केली आहे. पोलीस उपनिरीक्षक तळवंडे अधिक तपास करीत आहेत.