जेवणातून गुंगीचे औषध देऊन नोकर दाम्पत्याने केला लाखोंचा ऐवज लंपास

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन – महेशनगर पिंपरी येथे जेवणातून आई, वडील आणि मुलाला गुंगीचे औषध देऊन नोकराने घर साफ केले. नेपाळी नोकर दाम्पत्याने कपाटातून सात ते आठ तोळ्यांचे सोन्याचे दागिने आणि एक लाख रुपयांची रोकड चोरून नेल्याचा प्रकार मंगळवारी (दि. 11) दुपारी घडला.

काशिनाथ महादू नेरकर (77, रा. महेशनगर, पिंपरी), सुमनबाई काशिनाथ नेरकर (67), ग्रुप कॅप्टन दीपक काशिनाथ नेरकर (49) अशी गुंगीचे औषध दिलेल्या तिघांची नावे आहेत. या प्रकरणी दीपक यांच्या मुलीने पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, काशिनाथ नेरकर हे हिंदुस्थान अँटिबायटिक्स कंपनीतून निवृत्त झाले आहेत. तर दीपक हे स्टडी लिव्ह वर पुण्यात आले आहेत. ‘समीर’ या बंगल्याची रंगरंगोटी आणि डागडुजीचे काम सुरू आहे. तर नेपाळी दाम्पत्य मागील महिन्यात 28 तारखेला बंगल्यात घरकामासाठी राहायला आले. घरातील स्वयंपाक आणि अन्य काम हे दाम्पत्य करीत होते.

बंगल्यात रंगरंगोटीचे काम सुरू असल्याने दीपक यांच्या दोन मुली कोथरुड येथील घरी होत्या. दीपक यांच्या पत्नी अर्चना मुलींना आणण्यासाठी मंगळवारी सकाळी कोथरुड येथे गेल्या. अर्चना व मुली मंगळवारी दुपारी साडे तीन वाजता घरी आल्या. तेंव्हा काशिनाथ नेरकर त्यांची पत्नी सुमनबाई व दीपक हे झोपलेले होते. दुपारी अर्चना यांनी घराची कडी वाजवली, त्यावेळी दीपक यांनी झोपेतच येऊन उघडली आणि परत झोपी गेले. अनेक दिवसांचे काम सुरू असल्याने दमून झोपले‌ असतील, असे समजून दीपक यांच्या पत्नी अर्चना आणि मुलींनी त्यांना उठवले नाही. तसेच या तिघी देखील झोपल्या.

पाच वाजता अर्चना व मुली झोपेतून उठल्या. चहा करण्यासाठी नेपाळी महिलेला बोलविण्यासाठी गेल्या.

अर्चना यांनी घरातील कपाटात बघितले असता ते अस्ताव्यस्त उचकलेले दिसले. घरकाम करणारे नेपाळी दाम्पत्य देखील घरात नसल्याचे तसेच कपाट आणि बंगल्याचे मागील दार उघडे असल्याचे अर्चना यांच्या लक्षात आले. दागिने आणि पैसे कपाटात नसल्याचे तसेच पती, सासू सासरे यांना खाण्यातून काहीतरी घातल्याने समजल्याने अर्चना यांनी पोलिसांना घटनेची माहिती कळवली. तपास पिंपरी पोलिस आणि गुन्हे शाखा करीत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

घटस्फोटीत, विधुर पुरूषांना हृदयरोगाने मृत्युचा अधिक धोका

रात्री बेडवर पडल्यावर महिला कोणता विचार करतात ?

‘होम हेल्थ केअर’ची संकल्पना आणखी रूजायला हवी

पाहिल्या पाऊसाचा आनंद घ्या मनसोक्त, बिनधास्त भिजा